माविम‘तर्फे नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचा शुभारंभ बचत गटाची उत्पादने अव्वल दर्जाची; ब्रॅण्डिंगसाठी प्रयत्न करावेत ~ जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि २१: महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत राबविले जाणारे उपक्रम महिलांना आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. महिला बचत गटांच्या सदस्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करून उत्पादित केलेल्या अव्वल दर्जाच्या वस्तूंची ब्रॅण्डिंग, तसेच पॅकेजिंग गुणवत्तेसह वेगळेपण टिकवणे गरजेचे असल्याचे
प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्त महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने स्वराजभवन परिसरात आयोजित ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक नयन सिन्हा,
महिला व बाल विकासअधिकारी गिरीश पुसदकर, नाबार्डचे श्रीराम वाघमारे, माविम सहा.जिल्हा समनव्यय अधिकारी नीता अंभोरे, पोलिस निरिक्षक सुनील वायदांडे आदी उपस्थित होते.
श्री. कुंभार यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन सदस्यांशी संवाद साधला व विविध उत्पादनांची माहिती घेतली.
या तीनदिवसीय नवतेजस्विनी प्रदर्शनात ग्रामीण महिला भगिनींनी निर्माण केलेली उत्पादने अकोलेकरांना उपलब्ध होणार आहेत.
प्रदर्शनीत १०० बचत गटांचा प्रदर्शनात सहभाग असून, एकूण ५० दालनांद्वारे रसायनविरहित, भेसळविरहित खाद्यपदार्थ, शोभिवंत वस्तू, दैनंदिन वापरासाठी उपयुक्त वस्तू अशा अनेक बाबी उपलब्ध होणार आहेत. हे प्रदर्शन दि. २३ मार्चपर्यंत रोज सकाळी १० ते रात्री १० वा. दरम्यान सर्वांसाठी खुले आहे. या तीन दिवसांत बचत गटांच्या उत्पादन विक्रीतून १५ लाखांहून अधिक उलाढाल अपेक्षित आहे.
ग्राहकांना महिला बचत गटांनी तयार केलेली रासायनिक रंग विरहित, उत्पादने ग्राहकांना उपलब्ध होणार आहेत. या उत्पादनामध्ये मायक्रोमच्या शोभिवंत वस्तु ,बांबूचे टोपले, वारली पेंटिंग, गोडंबी ,लोकरीच्या च्या शोभिवंत वस्तू, घरातील, देव्हाऱ्यातील शोभिवंत वस्तू, ज्वेलरी, मातीपासून बनविलेल्या वस्तू, झाडू, फडा, तसेच खाण्याचे स्वादिष्ट पदार्थ, आवळा पदार्थ, रेडीमेड ढोकळा पीठ, नाना प्रकारचे सुगंधी मसाले, सर्व प्रकारचे लोणचे, विविध प्रकारचे पापड व पापड मसाले, गोडंबी ,पॉपकॉर्न. केळीपासून बनविलेले चिप्स, सर्व प्रकारचे तृणधान्य/कडधान्य, सर्व प्रकारच्या डाळी आदी उपलब्ध राहील.
त्याचप्रमाणे, विशेष दालनांद्वारे जेवणाबरोबरच खीर, मांडे, रोडगे, आवळा पुरणपोळी, बिट्ट्या, झुणका भाकर अशा मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल राहणार आहे.
००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा