जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नूतन इमारत शेतकरीभिमुख धोरणे राबविण्यास शासनाचे प्राधान्य पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 



अकोला, दि. 18 /अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने   विविध बाबतीत अग्रेसर राहत राज्यात चांगला लौकिक मिळवला आहे. शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी केंद्र व राज्य शासनाकडून  शेतकरीभिमुख धोरणे राबविण्यास प्राधान्य देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केले. 

चोहोट्टा बाजार येथील जिल्हा बँकेच्या नविन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

आमदार रणधीर सावरकर, बँकेचे उपाध्यक्ष श्रीधर कानकिरड, संचालक रमेशराव हिंगणकर, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, शिरीष धोत्रे, अंबादास तेलगोटे, डॉ. जयराज कोरपे तसेच प्रमुख अतिथी म्हणून हिदायतउल्लाखॉ पटेल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य, सेवा सहकारी सोसायट्यांचे आजी माजी पदाधिकारी, सदस्य व शेतकरी, ग्राहक ठेवीदार बँकेचे अधिकारी, गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. फुंडकर   म्हणाले की, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उत्तम कारभाराने बँकेने शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे. शेतकऱ्यांसाठी जिल्हा सहकारी बँक अत्यंत महत्त्वाची असते. बँकेची देदिप्यमान वाटचाल आहे. भविष्यातही व्यापक शेतकरीहितासाठी प्रयत्न व्हावेत. थकित कर्ज पुनर्गठनाची रक्कम शासनाकडून मिळण्या करीता सर्वतोपरी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

शेतकरी विकासाच्या मुख्य प्रवाहात राहीला पाहिजे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जपुनर्गठनाची संकल्पना मांडली होती. खातेदार थकीत न राहता तो नियमित कर्ज पुरवठा  प्रवाहात रहावा हा त्यामागील मुख्य हेतु होता.  बँकेने पुनर्गठीत केलेल्या कर्जाची रक्कम शासनाकडून प्राप्त होण्यासाठी  पाठपुरावा करण्यात येईल, असे प्रतिपादन आमदार श्री. सावरकर यांनी केले.

११६ वर्षापूर्वी स्थापन झालेली बँक आज जोमाने सुरू आहे. अनेक वर्षापासून थकीत असलेल्या शेतकरी सभासदांनी या बँकेच्या पीक कर्जाच्या गंगेपासून दूर जाऊ नये म्हणून बँकेचा प्रयत्न राहील. भविष्यात शेतकरी हिताचे अनेक निर्णय शासनाच्या मदतीने घेण्यात येतील. तसेच भारत सरकारच्या सोसायटी सक्षमीकरणाच्या कामात बँकेचा मोठा सहभाग असल्याचे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी प्रास्ताविकात केले.

कार्यक्रमाचे संचलन प्रशांत उकंडे यांनी व आभार प्रदर्शन बँकेच्या संचालिका श्रीमती भारतीताई गावंडे यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा