बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या महिला व बालविकास विभागाचे आवाहन
बेकायदेशीर बालगृहांची १०९८ वर माहिती द्या
महिला व बालविकास विभागाचे आवाहन
अकोला, दि. २१ : आपल्या परिसरात
कुठेही अनधिकृत, बालगृहे, वसतिगृहे चालवली जात असल्याचे आढळताच टोल फ्री क्रमांक १०९८
वर तत्काळ माहिती द्यावी व बालकांच्या शोषणास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे, असे
आवाहन महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे विनापरवानगी
बालगृहे, वसतिगृहे आणि अनाथाश्रम चालवले जात असल्याचे वृत्त माध्यमांद्वारे प्रसिद्ध
झाले. या ठिकाणी बालकांना जबरदस्तीने ठेवून त्यांच्यावर शारीरिक, मानसिक आणि लैंगिक
शोषण होत असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या. ही बाब अतिशय गंभीर असून बाल न्याय
अधिनियम २०१५, २०२१ मधील सुधारित कायदा आणि महाराष्ट्र बाल न्याय नियम २०१८ यांचे सरळ
उल्लंघन आहे.
या अधिनियमाच्या कलम ४२ नुसार, अशा प्रकारच्या संस्थांना आवश्यक ती
मान्यता व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करणे बंधनकारक आहे. प्रमाणपत्राविना संस्था चालवणाऱ्या
व्यक्तीस एक वर्षापर्यंत कारावास व किमान १ लाख रुपयांचा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ
शकतो.
नागरिकांनी आपल्या परिसरात अशा कोणत्याही अनधिकृत संस्थांची माहिती
मिळाल्यास त्वरित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा अथवा चाईल्ड
हेल्पलाइन टोल-फ्री क्रमांक १०९८ वर माहिती द्यावी, जेणेकरून बालकांवरील शोषण रोखता
येईल.
बालकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व नागरिकांनी सजग राहून प्रशासनास सहकार्य
करावे, असे आवाहन आयुक्त नयना गुंडे व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर
यांनी केले आहे.
000
शाखा डाकपालाचा गैरव्यवहार;
टपाल खातेदारांना माहिती सादर करण्याचे आवाहन
अकोला, दि. २१ : टपाल खात्याच्या वाई परगणे येथील शाखा डाकपालाने बचत
योजनांतील शासकीय रकमेचा खासगी कामांसाठी वापर केला. त्याबाबत कारवाई सुरू आहे. दरम्यान,
या शाखेच्या खातेदारांनी आपल्या बचत ठेव योजना, रकमा आदी माहिती कागदपत्रांसह दि. २५
एप्रिलपूर्वी सादर करण्याचे आवाहन खात्याच्या प्रवर अधिक्षकांनी केले आहे.
कारंजा उपडाकघरअंतर्गत वाई परगणे शाखा आहे. तेथील शाखा डाकपाल संजय
शाळिग्राम भुयटे यांनी खातेदारांच्या बचत खाते, आवर्ती जमा, सुकन्या समृद्धी योजना
अशा विविध खात्यांतील शासकीय रकमेचा गैरव्यवहार करून ती खासगी कामासाठी वापरल्याचा
गंभीर प्रकार निदर्शनास आला. त्याबाबत कारवाई सुरू आहे.
दरम्यान, या शाखेच्या खातेदारांनी आपले संबंधित बचत योजनेचे खातेपुस्तक
किंवा तत्सम कागदपत्रे दि. २५ एप्रिलपूर्वी सहाय्यक अधीक्षक, वाशिम पश्चिम उपविभाग,
मूर्तिजापूर यांच्याकडे तपासणीसाठी सादर करावीत. जे खातेदार मुदतीत आपले पुस्तक तपासणीला
सादर करणार नाहीत, त्यांचा कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही, असे आवाहन प्रवर अधिक्षकांनी
केले आहे.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा