‘एआय’बाबत नियोजनभवनात कार्यशाळा ‘एआय’चा विवेकी वापर आवश्यक सायबर तज्ज्ञांकडून कार्यशाळेत मार्गदर्शन
‘एआय’बाबत नियोजनभवनात कार्यशाळा
‘एआय’चा विवेकी वापर आवश्यक
सायबर तज्ज्ञांकडून कार्यशाळेत मार्गदर्शन
अकोला, दि. १५ : समाजजीवनात
२०२० नंतर ‘एआय’चा वापर झपाट्याने वाढत आहे. गुगल, युट्युब, गुगल मॅप्स यासारख्या साधनांद्वारे
आपण दररोज नकळत एआयचा वापर करत आहोत. ‘एआय’चा विवेकी, सुरक्षित व योग्य वापर आगामी
काळात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे विविध सायबर मार्गदर्शकांनी आज येथे सांगितले.
शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत नियोजनभवनात शासकीय कामकाजात
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत कार्यशाळा
झाली. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेश परंडेकर, जिल्हा
सूचनाविज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, तहसीलदार गौरी धायगुडे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत देवेंद्र पात्री, प्रशांत धर्मे, राहुल ताळे, वैभव चोपडे,
तेज गावंडे व प्रसाद तायडे यांनी मार्गदर्शन केले. विविध ‘एआय टूल्स’चा वापर कसा करावा,
शासकीय दस्तऐवज, मसुदा, आदेश, सादरीकरण तयार करताना एआय कसे मदत करू शकते, याविषयी
सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
राहुल ताळे यांनी चॅटजीपीटी, जेमिनीसारख्या एआयआधारित ॲप्सची माहिती
दिली. शासकीय कामकाज अधिक प्रभावी, जलद व पारदर्शक करण्यासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्त
आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेत ‘सायबर सिक्युरिटी’ या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरही विशेष
मार्गदर्शन करण्यात आले. इंटरनेटवर काम करताना डेटा सुरक्षित ठेवणे, पासवर्ड मॅनेजमेंट,
फिशिंग अटॅक्सपासून बचाव, तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती
तज्ज्ञांनी दिली. सायबर सुरक्षेच्या नियमांचे पालन करून एआयचा सुरक्षित वापर कसा करायचा,
याचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान उपस्थितांना प्रात्यक्षिक व हँड्सऑन सत्राद्वारे
अनुभव देण्यात आला. मोबाईल फेस अनलॉक, ट्रॅफिक अपडेट्स, ट्रान्सलेशन, ऑनलाइन शॉपिंग
संकेतस्थळांवरील जाहिराती यामागील एआयची कार्यपद्धती समजावून सांगण्यात आली.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा