अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून एक लक्ष मराठा तरूण झाले उद्योजक

 अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून

एक लक्ष मराठा तरूण झाले उद्योजक

अकोला, दि. 31 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून राज्यात 1 लक्ष मराठा उद्योजकांची संख्या पूर्ण झाली.

या पार्श्वभूमीवर महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा) यांनी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गौरव केला.

        अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यत 1 लक्ष 14 लाभार्थी झाले असून, 8 हजार 320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरित केले आहे व त्यापैकी महामंडळाने 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.

        मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले व जुन्या योजना बंद करुन नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले व महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली.

        महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेताच नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्हे व तालुक्यांचा दौरा करुन महामंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी युवकांना उद्योजक होण्यासाठी मार्गदर्शन केले. त्यामुळे अनेक तरुण-तरुणींना उद्योजकांच्या प्रवाहात सामील झाले. तसेच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत कर्जपुरवठा मिळण्यासाठी सर्व संबंधितांच्या सातत्याने बैठका घेण्यात आल्या आणि राज्य सरकारच्या अर्थ विभागाने व्याज परतावा केला.

        महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मंत्री महोदय यांचेबरोबरच शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी, राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी-कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांनी तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.

 

000

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज