वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची बैठक शेतक-यांना केंद्रस्थानी ठेवून योजना प्रभावीपणे राबवा - अध्यक्ष नीलेश हेलोंडे





 

 
अकोला, दि. 9 : शेतकरी बांधवांवर आत्महत्या करण्याची वेळच येऊ नये यासाठी त्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषी, आरोग्य, सिंचन, शिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी. पशुधनाला हिरवा चारा उपलब्ध होण्यासाठी वैरण विकास कार्यक्रमाची ठोस अंमलबजावणी जुलै अखेरपर्यंत करावी, असे निर्देश कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे यांनी आज दिले.
लोकशाही सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे, ‘महाबीज’चे विजय अस्वार यांच्यासह विवीध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ॲड. हेलोंडे म्हणाले की, ग्रामीण भागातील  गायरान जमिनीवर कुरण विकास कार्यक्रम राबवून पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतींसह पशुसंवर्धन विभागाने कृतीशील कार्यक्रम राबवावा. जिल्ह्यात गायरान जमीनीवर चारा लागवडीसाठी जिल्ह्यात 12 गावांची निवड करण्यात आली आहे. अल्पभूधारकाला चारा उत्पादनासाठी जमीन राखणे शक्य नाही. निवड झालेल्या गावात गायरान जमीनी निश्चित कराव्यात. या महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यक्रमाची ठोस अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश त्यांनी दिले.  
ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कृषी, सिंचन, पशुसंवर्धन, शिक्षण, पूरक व्यवसाय यासंबंधीच्या योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत. प्रेरणा प्रकल्पात शेतक-यांचे समुपदेशन करण्यात येते. मात्र, केवळ समुपदेशनापुरते मर्यादित न राहता आरोग्य तपासणी, आवश्यक उपचार मिळवून देण्याची कार्यवाहीही व्हावी. तणावमुक्ती शिबिराबरोबरच वैद्यकीय शिबिरेही घ्यावीत. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी आठवी व नववीची पाठ्यपुस्तके वितरणासाठी खनिकर्म विकास निधी, सीएसआर आदी स्त्रोतांद्वारे निधी उपलब्ध करून द्यावा.

मूर्तिजापूर तालुक्यातील वाई लघुपाटबंधारे योजनेचा आढावाही त्यांनी घेतला. हे काम पुढे जाण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा व्हावा. त्यासाठी आपणाकडूनही संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. ‘महाबीज’कडून सीएसआर फंडातून शेतकरी कुटुंबांना टोकन यंत्रांचे वितरण करण्यात येत आहे. त्याचाही आढावा त्यांनी घेतला.
००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज