जिल्हाधिकाऱ्यांकडून सर्व यंत्रणांचा आढावा नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्यावी - जिल्हाधिकारी अजित कुंभार








अकोला, दि. २० : पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी सजग राहून पार पाडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहता नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे दिले.


जिल्हाधिकाऱ्यांनी विविध यंत्रणांचा ऑनलाइन बैठकीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना तत्काळ नुकसान भरपाई मिळवून द्यावी. जिल्ह्यात काही ठिकाणी साथरोग उद्भवल्याच्या घटना घडल्या. त्यादृष्टीने पेयजल स्त्रोतांची सुरक्षितता, स्वच्छता, जलवाहिन्यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक आहे. वास्तविक  पावसाळ्यापूर्वीच ग्रामपंचायतीमार्फत ही कामे राबवली जाणे अपेक्षित असते. गावोगाव जलस्त्रोतांची सुरक्षितता तपासावी. आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी. रुग्णालयातील यंत्रणा, औषध साठा आदी बाबी सुसज्ज ठेवाव्यात. अनेकदा दूषित पाण्यामुळे साथी उद्भवतात. त्यामुळे सर्वदूर प्रभावी जनजागृती करावी. धूर फवारणी, स्वच्छता मोहीम राबवावी. याबाबत ग्रामपंचायतींना सूचना द्याव्यात. कुठेही अस्वच्छता दिसता कामा नये. आपण स्वतः विविध ठिकाणी भेट देणार असून कुठेही कामात हलगर्जी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. 


पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नदी- नाल्यांच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. रस्त्याहून पाणी वाहत असेल तर सुरक्षित मार्गाने वाहतूक वळवावी. ग्रामीण भागातील रस्ते, वाहतूक सुस्थितीत व सुरळीत आहेत का याची तपासणी करावी. कुठेही दुर्घटना घडता कामा नये. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी दृष्टीने पाहणी करावी. रस्ते नादुरुस्त असतील तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी.

शाळांच्या इमारती सुरक्षित आहेत की नाहीत हे तपासून आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.


००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज