जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नाने दोन मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नाने

दोन मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर

अकोला, दि. 3 ; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या प्रयत्नाने तेल्हारा येथे मामाकडे राहणा-या दोन मुलांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एस. तिवारी यांच्या मार्गदर्शनात विधी सेवा प्राधिकरणाने ही कार्यवाही केली.

याबाबतची हकीकत अशी की, जळगाव जामोद येथील दोन भावंडांच्या आईवडलांत कौटुंबिक कलह सुरू झाला. ही मुले त्यावेळी जळगाव जामोद येथेच शिक्षण घेत होती. पुढे मुले तेल्हारा येथे मामाकडे राहू लागली. दुर्देवाने त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर मुलांना तेल्हारा येथील शाळेतच शिक्षण घेण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्या वडलांचा विरोध होता. जळगाव जामोद येथील शाळेनेही सहकार्य करण्यास नकार दिला.

यानंतर विधीज्ञ व्ही. जे. भांबेरे यांनी हे प्रकरण विधी सेवा प्राधिकरणाकडे आणले. मुलांची तेल्हारा येथे मामाकडे शिक्षणाची इच्छा पाहून प्राधिकरणाकडून जळगाव जामोद येथील शाळा व मुलाच्या वडलांना नोटीस काढली. शिक्षणाधिकारी सुचेता पाटेकर यांच्याशीही चर्चा करण्यात आली. प्रतिनिधीमार्फत मुलाच्या वडलांचे समुपदेशन करण्यात आले. मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्राधिकरणाने मध्यस्थीची भूमिका बजावली. अखेर वडलांनी संमती दर्शवली व दोन्ही मुलांना तेल्हारा येथील शाळेत प्रवेश मिळाला.

मध्यस्थी केंद्रात मुक्तपणे संवाद साधता येतो. वादाचे कारण, परिस्थिती, परिणामाची जाणीव करून दिली जाते. आपसातील वाद न्यायालयात जाण्यापूर्वीच मध्यस्थी केंद्रात मिटविण्याचे आवाहन प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी केले. प्राधिकरण अकोला जिल्हा न्यायालय परिसरात असून संपर्क भ्रमणध्वनी क्र. 8591903930 व दूरध्वनी क्र. 0724-2410145 हा आहे.

००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज