भुशी धरणावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात घडू नये पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा - जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश

 

भुशी धरणावरील दुर्घटनेची पुनरावृत्ती जिल्ह्यात घडू नये

पर्यटनस्थळी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा

-        जिल्हाधिकारी अजित कुंभार यांचे आदेश

अकोला, दि. 10 : पावसाळ्यात नदी, तलाव, धबधबे, गडकिल्ले, जंगल आदी पर्यटनस्थळी आपत्तीची घटना घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

 

लोणावळा येथील भुशी धरणावर घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात आवश्यक उपाययोजनांबाबत विविध विभागांसाठी परिपत्रक जिल्हाधिका-यांनी जारी केले आहे. धबधबे, नदी-तलाव, गड, जंगल आदी ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी येतात. त्याठिकाणी वन विभाग, पुरातत्व विभाग, पाटबंधारे व संबंधित यंत्रणांनी उपविभागीय अधिकारी यांच्या समवेत भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी करावी. सुरक्षिततेसाठी आवश्यक तिथे नियंत्रण रेषा आखावी व प्रतिबंधात्मक क्षेत्र असल्याचे फलक लावावेत, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

आपत्तीप्रवण स्थळे बंद ठेवा

संभाव्य आपत्तीप्रवण स्थळे आढळल्यास व तिथे उपाययोजना करणे शक्य नसेल अशी ठिकाणे पर्यटकांसाठी बंद करावीत. तशी अधिसूचना ‘एसडीओं’नी जारी करावी. वारी हनुमान, वाण प्रकल्प, पोपटखेड प्रकल्प, काटेपूर्णा व मोर्णा प्रकल्प, काटेपूर्णा व मेळघाट अभयारण्य अशा ठिकाणी पर्यटकांसाठी ‘काय करावे व काय करू नये’ याबाबत सूचनाफलक लावावेत.

जलपर्यटनस्थळी बचाव पथके ठेवा

जलपर्यटनाच्या ठिकाणी पट्टीचे पोहणारे, शोध व बचाव पथक, जीवरक्षक, लाईफ जॅकेटस्, लाईफ रिंग, होड्या आदी व्यवस्था करावी. उपविभागीय कार्यालयांनी सर्व विभागांत समन्वय ठेवावा. कावड यात्रा, धारगड यात्रा अशा ठिकाणी तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य, स्थानिक स्वराज्य संस्थांनी स्वच्छता, बचावकार्य व आरोग्य सुविधांबाबत नियोजन करावे. मोठ्या प्रकल्पाच्या, तसेच गर्दीच्या ठिकाणी सुविधांसाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळवावे. प्रथमोपचार सुविधेसह रूग्णवाहिका उपलब्ध असावी, असे निर्देश श्री. कुंभार यांनी दिले.

पर्यटनस्थळी वाहनांची गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरक्षितता उपायांची अंमलबजावणी व्हावी. रस्तेदुरूस्ती, गतिरोधक, दिशादर्शक आदी उपाययोजना कराव्यात.  पर्यटनस्थळी, मंदिराच्या ठिकाणी जाणा-या रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे हटविण्याबाबत मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांनी कार्यवाही करावी. नदीनाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असताना वाहने पुरात वाहून गेल्याच्या घडल्या आहेत. त्याबाबत परिवहन विभाग, परिवहन महामंडळ यांनी आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज