महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे जिल्हाधिकारी वर्षा मीना
महिला व बालविकास विभागाचे 100 दिवसांचे अभियान
महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे
जिल्हाधिकारी वर्षा मीना
बालविवाहाच्या पत्रिका न छापण्याचा मुद्रक संघाचा निर्धार
धार्मिक नेते व विविध घटकांचा अभियानात सहभाग
अकोला, दि. 18 : महिला व बालविकास विभागाकडून बालविवाहमुक्त महाराष्ट्र
अभियानात सर्व विभाग, धार्मिक नेते,स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी
संघटना व नागरिक यांना एकत्र आणण्यात येत आहे. त्यासाठी
दि. 26 जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून, सर्वांनी समन्वयाने
कार्य करून महाराष्ट्र बालविवाहमुक्त करण्यात योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी
वर्षा मीना यांनी आज येथे केले.
बालविवाहमुक्त महाराष्ट्र या 100 दिवसांच्या मोहिमेच्या अनुषंगाने बैठक
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा बालसंरक्षण
अधिकारी राजू लाडुलकर, समिती सदस्य, बालकांच्या क्षेत्रात कार्य करणा-या स्वयंसेवी
संस्थांचे प्रतिनिधी, धार्मिक नेते यांच्यासह विवाहासंबंधित सेवा पुरवठादार हॉलमालक,
मंडपमालक, लग्न पत्रिका छापणारे मुद्रक, वाजंत्री पथक, आचारी आदी व्यावसायिकांच्या
संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्रीमती मीना म्हणाल्या की, जिल्ह्यात बालविवाह पूर्णपणे
रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळीच कठोर कार्यवाही आणि गावोगाव व्यापक जनजागृती करावी.
ग्राम स्तरावरील समित्या, अधिकारी-कर्मचारी यांच्या क्षमता वृद्धीसाठी कार्यशाळा घ्याव्यात.
विद्यार्थ्यांचा, युवकांचा सहभाग मिळवून कार्यक्रम घ्यावेत. बालविवाहमुक्त भारत या
विषयावर शिक्षण विभागाने पोस्टर स्पर्धा आयोजित करावी. काही बालविवाह रोखण्यात आले
म्हणून समाधान मानून चालणार नाही. एकही बालविवाह होऊ नये असे प्रयत्न व्हावेत, असे
निर्देश त्यांनी दिले.
अनुपस्थितांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा
बैठकीस अनुपस्थित असलेल्या अधिकारी-कर्मचा-यांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा देण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी
यावेळी दिले. बालविवाहाच्या पत्रिका छापणार नसल्याचा निर्धार मुद्रक संघाने केला असून,
इतर सेवा पुरवठादार व घटकांनीही बालविवाहात कुठलेही सहकार्य केले जाणार नाही असे यावेळी
सांगितले.
०००

.jpeg)


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा