लघु, मध्यम उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज महामेळावा; कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी उपयुक्त उपक्रम खासदार अनुप धोत्रे
लघु, मध्यम उद्योजकांसाठी सेंट्रल बँकेचा कर्ज महामेळावा; कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण
उद्योजकांना पाठबळ मिळण्यासाठी उपयुक्त उपक्रम
खासदार अनुप धोत्रे
अकोला, दि. 21 : जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे
लघु, मध्यम उद्योजकांसाठी कर्ज महामेळावा खासदार अनुप धोत्रे यांच्या उपस्थितीत आज
झाला. छोट्या उद्योजकांना आर्थिक बळ मिळवून देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा
विश्वास खासदार श्री. धोत्रे यांनी यावेळी व्यक्त केला.
औद्योगिक वसाहतीतील अकोला इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या सभागृहात मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले. खासदार श्री. धोत्रे यांनी उपस्थित राहून बँकेच्या उपक्रमांचे कौतुक
केले. असोसिएशनचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल, बँकेच्या सहायक महाव्यवस्थापक बिनिता राणी,
विभागीय प्रमुख पंकज कुमार, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा व आरबीआयचे पीयुष
अग्रवाल उपस्थित होते.
या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योग, उद्योजक व सूक्ष्म-मध्यम
व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ दिले जाईल, असे पंकज कुमार यांनी यावेळी
सांगितले.
कार्यक्रमात ग्राहक संवाद उपक्रमाचेही आयोजन करण्यात आले. मुख्य व्यवस्थापक
सचिन डोके यांनी उद्योजकांशी संवाद साधत त्यांच्या आर्थिक गरजांचा आढावा घेण्यात आला.
पात्र लाभार्थ्यांना विविध कर्ज योजनांअंतर्गत मंजुरीपत्रांचे वितरण करण्यात आले. सें.
बिझनेस योजना, सें. जीएसटी योजना, सें. हॉटेल योजना, सें. संजीवनी योजना, सीएमईजीपी,
कर्जवितरण व इतर बँकांच्या योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.
व्यापारी, उद्योगपती आणि बँक कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रमाला
चांगला प्रतिसाद मिळाला.
०००



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा