तरुणांनो, ड्रोन पायलट व्हा; मोफत मिळणार प्रशिक्षण

 तरुणांनो, ड्रोन पायलट व्हा; मोफत मिळणार प्रशिक्षण

अकोला दि. 11 : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवतींना रोजगाराची नवी दिशा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत ड्रोन पायलटसाठीचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमातून तरुणांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण रोजगार क्षम बनवणे आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना दहा दिवसाचे डीजीसीए मान्यताप्राप्त प्रशिक्षण दिले जाईल. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अधिकृत दूरसंवेदन पायलट परवाना मिळणार आहे. या परवान्यामुळे कृषी, सर्वेक्षण, बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन, छायाचित्रण आणि चित्रफीत निर्मिती अशा विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसायाचे दरवाजे खुले होतील. प्रशिक्षणात एकूण आठ प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामध्ये मध्यम व लघु वर्गातील ड्रोन प्रशिक्षण, प्रशिक्षकांचे प्रशिक्षण, कृषी व आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, नकाशांकन व सर्वेक्षण, ड्रोन देखभाल-दुरुस्ती आणि छायाचित्रण व चलचित्र निर्मिती यांचा समावेश आहे. प्रत्येक तुकडीमध्ये पंधरा विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. हे प्रशिक्षण पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती, रायगड, कोल्हापूर आणि परभणी येथील केंद्रावर आयोजित केले जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील समाजांना इतर कोणत्याही शासकीय महामंडळाकडून योजनांचा लाभ मिळत नाही ते या योजनेसाठी पात्र आहेत.

अमृतच्या लक्षित गटामध्ये खुल्या वर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ब्राह्मण, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, मारवाडी, ठाकूर, त्यागी, सेनुगुंथर, गुजराती, ऐयांगर, जाट, सिंधी, कानबी, राजपूत, कोमटी, हिंदू नेपाळी, भूमिहार इत्यादी जातींचा समावेश आहे. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा व 18 ते 45 वर्ष दरम्यान असावे, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाख रुपये पेक्षा कमी असावे आणि तो किमान दहावी उत्तीर्ण असावा. अमृतच्या उपक्रमातून खुला प्रवर्गातील तरुणांना रोजगाराची संधी मिळेल. पहिल्या तुकडीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 नोव्हेंबर 2025 असून प्रशिक्षण हे १० ते २० नोव्हेंबर 2025 या कालावधीत होईल. जागा मर्यादित असल्याने इच्छुकांनी पुढील तुकडीसाठी ही नोंदणी करून ठेवावी असे, आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, जिल्हा अधिकारी कार्यालय परिसर, जुनी प्रशासकीय बिल्डिंग, अकोला संपर्क ९११२२२७६३६ येथे साधावा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा