शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला; जिल्ह्यात 20 परीक्षा केंद्रे केंद्रांवर कडक बंदोबस्त
शिक्षक पात्रता परीक्षा 23 नोव्हेंबरला; जिल्ह्यात 20 परीक्षा केंद्रे
केंद्रांवर कडक बंदोबस्त
अकोला, दि. 20 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टेट २०२५) दि. २३ नोव्हेंबरला होणार आहे. जिल्ह्यात एकूण 20 परीक्षा केंद्रे असतील.
परीक्षेत पहिला पेपर सकाळी १०:३० ते दु. १ या वेळेत व दुसरा पेपर दुपारी २:३० ते ५ या कालावधीत होईल. पहिल्या पेपरसाठी एकूण १४ केंद्रे निश्चित असून, ४ हजार २०० परीक्षार्थी व दुस-या पेपरसाठी एकूण २० केंद्रांची निश्चित असून, परीक्षार्थी ५ हजार ५९४ आहेत. दोन्ही पेपर मिळून ९ हजार ७९४ परिक्षार्थी परीक्षेला बसतील. त्यातील १५९ परिक्षार्थी हे दिव्यांग असून त्यांना नियमानुसार अनुग्रह कालावधी अनुज्ञेय राहील. परीक्षार्थींना ओळखीचा पुरावा व परीक्षेचे प्रवेशपत्र सोबत ठेवणे बंधनकारक आहे.
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेतील जिल्हास्तर परीक्षा आयोजन व संनियंत्रण समितीमार्फत आयोजन होते. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे उपाध्यक्ष व प्राथमिक शिक्षणाधिकारी हे सदस्य सचिव आहेत. परीक्षेच्या सुयोग्य आयोजनासाठी प्राथमिक शिक्षणाधिका-यांच्या कार्यालयात जिल्हा सनियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
परिक्षेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी १ जिल्हा परीरक्षक, ५ झोनल अधिकारी, २० सहायक परीरक्षक, २० केंद्र संचालक, ५२ पर्यवेक्षक व २४१ समवेक्षक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी परीक्षार्थींना बायोमेट्रिक सिस्टीम, फेस स्कॅनिंग, मेटल डिटेक्टर यांच्या तपासणीतून जावे लागेल.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर व प्रत्येक वर्गखोलीत सर्व परीक्षार्थी हे एआय तंत्रज्ञानावर आधारित लाईव्ह सीसीटीव्हीच्या निगराणीत असणार आहेत. यावर्षी नव्यानेच सर्व परिक्षार्थी यांचे "फोटो व्ह्यू" सिस्टीमद्वारे तपासणी होणार आहे. यामुळे डमी उमेदवार ओळखण्यास मदत होणार आहे. तसेच "कनेक्ट व्ह्यू" या तंत्रज्ञानाद्वारे सर्व केंद्र संचालक, जिल्हा सनियंत्रण कक्ष व परिक्षा परिषद, पुणे यांच्यात हॉट लाईनची सुविधा उपलब्ध होणार आहे. सेंटर कोड डायल करताच क्षणात संपर्क साधता येणार आहे.
दिवसभर सूचना देण्याची आणि प्राप्त करण्याची नोंद स्वयंचलितरीत्या जतन होणार असल्याने परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता व नियंत्रण येणार आहे. परीक्षा परिषदेच्या या नव्या पावलांमुळे यंदाची टीईटी इतिहासातील सर्वाधिक कडक नियमनाखाली घेण्यात येणार असल्याचे दिसत आहे.
भरारी पथकाचीही नियुक्ती
परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (माध्य.), शिक्षणाधिकारी (योजना) यांच्या भरारी पथकाची केंद्रावर नजर राहणार असून शिक्षणाधिकारी (प्राथ.) हे भरारी पथकासह संपूर्ण परिक्षेचे नियंत्रण अधिकारी म्हणून परिक्षेच्या संपूर्ण कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.
अकोला जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे : खंडेलवाल ज्ञान मंदिर विद्यालय, जसनागरा पब्लिक स्कुल, रिधोरा, श्री समर्थ पब्लिक स्कुल, भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, अकोला, द नोएल इंग्लिश सीबीएससी स्कूल, अकोला, श्री शिवाजी हायस्कूल, मुख्य शाखा, अकोला, न्यू इंग्लिश हायस्कूल, भारत विद्यालय, श्री शिवाजी महाविद्यालय, स्कुल ऑफ स्कॉलर्स, जागृती विद्यालय, मोहरीदेवी खंडेलवाल विद्यालय, श्री सरस्वती इंग्लिश विद्यालय, श्री समर्थ पब्लिक स्कुल, रिधोरा, सीताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालय, श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय, गुरूनानक विद्यालय, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, उस्मान आझाद उर्दू हायस्कूल.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा