‘ईव्हीएम सील’ ब्रेक झाल्याचे समाजमाध्यमांवरील ते वृत्त खोटे तथ्यहीन व निराधार पोस्टवर विश्वास ठेवू नये - जिल्हाधिकारी अजित कुंभार

‘ईव्हीएम सील’ ब्रेक झाल्याचे समाजमाध्यमांवरील ते वृत्त खोटे

तथ्यहीन व निराधार पोस्टवर विश्वास ठेवू नये

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला दि. 29 :  जिल्ह्यातील ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीचे काटेकोर पालन करुन पार पाडण्यात आली आहे. तथापि, समाजमाध्यमांवर 300 ईव्हीएमचे ‘पिंक सील’ ब्रेक झाल्याचे खोटे वृत्त प्रसारित झाले आहे. अशा तथ्यहीन व निराधार पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

निराधार वृत्त प्रसारित केल्यास कारवाई करणार

यापुढे अश्या प्रकारच्या तथ्यहिन व निराधार पोस्ट पसरविणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.  

 

अकोला शहरातील काही नागरिकांना व्हाट्सअपसारख्या समाजमाध्यमांवर पुढीलप्रमाणे मेसेज प्राप्त झाला : लोकसभा निवडणुकीनंतर अकोला जिल्ह्यातील ईव्हीएमचे नुकतेच फर्स्ट लेव्हल चेकिंग (एफएलसी) झाले व त्यामध्ये जवळजवळ ३०० ईव्हीएमचे पिंक सिल ब्रेक झालेले आढळले. हे अत्यंत गंभीर आहे. कदाचित हेच आपल्या पराभवाचे मुख्य कारण असू शकते. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अधिक सजगपणे आपण काम केल्यास हे टाळू शकतो. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजू 5 वेळा ईव्हीएम चेक होणार आहे. कृपया प्रतिनिधी पाठवा.. प्रशांत गावंडे (अकोला).

 

हा संपूर्ण मजकूर तथ्यहीन व चुकीचा आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीअंतर्गत वापरण्यात आलेल्या ईव्हीएम (कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट) अद्याप सुरक्षा कक्षात सीलबंद आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार अमरावती व यवतमाळ जिल्ह्याकडून अकोला जिल्ह्यासाठी प्रथमस्तरीय तपासणीसाठी आवश्यक ईव्हीएम उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

अकोला जिल्ह्यात दि. १ ऑगस्ट ते दि. २३ ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या प्रथमस्तरीय तपासणीत लोकसभा निवडणूकीत वापरलेल्या ईव्हीएम सुरक्षा कक्षात सीलबंद असल्यामुळे वापरण्यातच आलेल्या नाहीत. त्यामुळे 'पिंक सिल ब्रेक झालेले आढळले' ही तथ्यहीन व निराधार माहिती पसरवण्यात आलेली आहे. तसेच मेसेजमध्ये नाव असलेली व्यक्ती कार्यालयीन दस्तऐवजानुसार प्रथमस्तरीय तपासणीदरम्यान एकही दिवस उपस्थित झालेली नाही.

 

अकोला जिल्ह्यात आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून ईव्हीएमची प्रथमस्तरीय तपासणी दि. १ ऑगस्ट ते दि. २३ ऑगस्ट  या कालावधीत कार्यप्रणालीचे तंतोतंत पालन करून उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांना प्रथमस्तरीय तपासणी निरिक्षक म्हणून नेमून पार पाडण्यात आलेली आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रथमस्तरीय तपासणीचे ठिकाणी नियमित भेट देऊन प्रक्रिया योग्य सुरु असल्याची खात्री केली आहे.

या तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य वखा महामंडळ, एमआयडीसी फेज ४ शिवणी, अकोला येथील सुरक्षा कक्ष उघडताना, बंद करताना व प्रत्यक्ष प्रथमस्तरीय तपासणीचे कामकाज सुरू असताना उपस्थित राहणेबाबत अकोला जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना लेखी स्वरुपात पत्र व्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार सदर प्रक्रिया सुरु असताना विविध पक्षांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित राहून पाहणी केली आहे.

ज्या पक्षांचे प्रतिनिधी अनुपस्थित होते त्यांना त्याबाबत तीन वेळा स्मरणपत्र देखील देण्यात आलेले आहे. तसेच प्रथमस्तरीय तपासणीचे शेवटचे दिवशी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष प्रतिनिधी यांना प्रारुप मतदानासाठी (मॉक पोल) देखील आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार विवि मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी सदर प्रक्रियेकरीता उपस्थित राहून स्वतः प्रारुप मतदान प्रक्रियेमा सहभाग देखील नोंदवला आहे. प्रथमस्तरीय तपासणीचे ठिकाणी आवश्यक तो पोलीस सुरक्षा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. तसेच कोणतीही बाहेरील इलेक्ट्रॉनिक वस्तू नेता येऊ नये म्हणून डोअरफ्रेम मेटल डिटेक्टर स्थापित करण्यात आले होते, याप्रकारे प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यात आली. त्यामुळे कोणीही अफवेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

000000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज