जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा














 


 

 

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

विविध घटकांसाठी नव्या योजनांमुळे

विकासप्रक्रिया अधिक व्यापक

-         जिल्हाधिकारी अजित कुंभार

 

अकोला, दि. 15 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, वयोश्री योजना, योजनादूत अशा नवनव्या योजनांद्वारे राज्य शासनाने विकासप्रक्रिया अधिक व्यापक व गतिमान केली आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.       

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात दिमाखात फडकणारा राष्ट्रध्वज,राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीताचे आसमंतात निनादणारे सूर अशा मंगलमय  वातावरणात भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापनदिन आज साजरा करण्यात आला, यावेळी राष्ट्रध्वजारोहणानंतर ते बोलत होते. जि. प. अध्यक्ष संगीता अढाऊ, आमदार अमोल मिटकरी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी, पोलिस अधिक्षक बच्चन सिंह, महापालिका आयुक्त डॉ.सूनील लहाने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी  उपस्थित होते.

सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून प्रत्येक योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर शासनाचा व प्रशासनाचा भर आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी महसूल पंधरवड्यातील उपक्रम व विविध नव्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती दिली.

ते म्हणाले की, जिल्ह्यात शेतकरी बांधवांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. खरीप कर्जवितरणात अकोला जिल्हा राज्यात पहिल्या चार जिल्ह्यांत आहे.  कृषी विभागाकडून 2023 मधील खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना आर्थिक मदत वितरीत करण्यात येत आहे. त्याचा लाभ जिल्ह्यातील 2 लाख 16 हजार 420 कापूस उत्पादक आणि 3 लाख 68 हजार 918 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. यंदा खरीप हंगामात पिकविमा योजनेत 4 लक्ष 28 हजार 859 शेतकरी सहभागी असून 3 लक्ष 54 हजार 299 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, ‘मनरेगा’ मध्ये फळबाग लागवड,

प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, वैयक्तिक शेततळी, कृषी यांत्रिकीकरण योजना, पोकरा आदी योजनांतील अंमलबजावणीचाही त्यांनी भाषणात उल्लेख केला.

 प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत सुमारे 112 कोटी रूपये निधीतून गावोगावी रस्त्यांचा विकास होत आहे. जिल्हा नियोजन समितीकडून पोलीस स्टेशनमध्ये अभ्यागत कक्ष, 43 क्रीडांगणे व 59 व्यायामशाळांचा विकास, महिला रूग्णालयाचे बांधकाम व विस्तारीकरण, तांडा विकास योजनेत 23 विकासकामे, 27 कोटी निधीतून वीज पुरवठा सुधारणेची 402 कामे, अद्ययावत जलतरण तलाव अशी अनेक कामे प्रगती पथावर आहेत.

जिल्हा रूग्णालयात सुमारे 50 लाख निधीतून ‘ब्लड कॉम्पोनंट सेपरेशन युनिट लवकरच निर्माण होणार आहे. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेत 55 हजार 179, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत सुमारे 2 हजार व्यक्तींना लाभ देण्यात येत आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 1250 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून 195 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात अकोला जिल्हा राज्याच्या क्रमवारीत दुसरा असून उद्दिष्टाहून अधिक 961 प्रकरणे मंजूर व 36 कोटी 14 लक्ष रूपये कर्जपुरवठा करण्यात आला. ‘माविमच्या माध्यमातून 4 हजार 373 महिला बचत गट स्थापन होऊन 45 हजारहून अधिक महिला जोडल्या गेल्या. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये  ग्रामीण भागात 43 हजार 455 घरकुले पूर्ण आहेत. रमाई आवास योजनेत 18 हजार नऊ, शबरी आवास योजनेत 2 हजार 985, मोदी आवास योजनेमध्ये 2 हजार 487 घरकुले पूर्ण झाली आहेत.

दलित वस्ती सुधार योजनेत 42 कोटी 95 लाख रू. निधीतून जिल्ह्यात सामाजिक सभागृहे व रस्त्यांची कामे राबविण्यात आली.  अडीच हजार विद्यार्थ्यांना ‘स्वाधार योजनेत लाभ देण्यात आला आहे. आदर्श ग्राम योजनेत 57 गावे आदर्श घोषित करण्यात आली आहेत. नगरोत्थान व दलितेतर योजनेत जिल्ह्यासाठी 49 कोटी 61 लक्ष रू. निधीतून कामे राबविण्यात आली.

जिल्ह्यात प्रत्येक घटकासाठी विविध योजना व्यापकपणे राबवल्या जात आहेत. विकासाची ही प्रक्रिया असाच निर्धाराने पुढे नेण्यासाठी  आपण सर्वजण एकजूट होऊया, या मंगलमय पर्वावर आज स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासाचे स्मरण करतानाच, देशहितासाठी कृतीशील व कर्तव्याप्रती बांधील होण्याचा संकल्प आपण करूया, असे आवाहन त्यांनी केले.

 

उपवनसंरक्षक कुमार स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव, उपजिल्हाधिकारी महेश परंडेकर, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.तरंगतुषार वारे, शा.वै.महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, भूजल सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराड यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, स्वातंत्र्यसैनिक व शहिद सैनिकांचे कुटुंबिय, अधिकारी, कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश तलवारे यांनी केले.

०००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज