विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम अंतिम मतदार याद्या शुक्रवारी प्रसिद्ध होणार जिल्ह्यात 27 हजार 153 मतदारांची वाढ

 

 

 

विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्र

अंतिम मतदार याद्या शुक्रवारी प्रसिद्ध होणार

                 जिल्ह्यात 27 हजार 153 मतदारांची वाढ

अकोला, दि. 29 : निवडणूक आयोगाकडून एक जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचा सुधारित विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्यात मतदार याद्यांची अंतिम प्रसिद्धी उद्या दि. 30 ऑगस्ट रोजी होणार असून, या कार्यक्रमाद्वारे एकूण 27 हजार 153 मतदारांची वाढ झाली आहे.

स्त्री मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ

                प्रारुप व अंतिम मतदार याद्यांची तुलना करता अंतिम मतदार यादीमध्‍ये 9 हजार 662 पुरूष, तर 17 हजार 489 महिला व 2 तृतीयपंथी अशा 27 हजार 153 इतक्‍या मतदारांची वाढ झाली आहे. पुनरीक्षणात पुरुष मतदारांच्‍या तुलनेत स्‍त्री मतदारांची 7 हजार 827 ने अधिक नाव नोंदणी झाली. ही वाढ 2.27 टक्के इतकी आहे.

पाच हजार 929 तरूण मतदार वाढले

                दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या प्रारुप मतदार यादीमध्‍ये एकूण 18 ते 19 वयोगटातील मतदारांची संख्‍या ही 26 हजार 616 इतकी होती. ती अंतिम मतदार यादीमध्‍ये 32 हजार 545 इतकी झाली आहे. एकूण 5 हजार 929 इतक्‍या तरुण नवमतदारांची वाढ असून सदर वाढ ही 22 टक्के आहे.

अंतिम मतदार यादीनुसार, जिल्ह्यात 8 लाख 26 हजार 651 पुरूष, 7 लाख 88 हजार 767 स्त्रिया, 49 इतर असे एकूण 16 लाख 15 हजार 467 मतदार आहेत.

अंतिम यादी ‘बीएलओं’कडे उपलब्ध राहील

मतदार याद्यांची प्रारुप प्रसिध्‍दी दि. 6 ऑगस्टला करण्‍यात आली होती. त्यानंतर दि. 20 ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्‍यात आल्या आणि उद्या शुक्रवारी मतदार याद्यांची अंतिम प्रसिध्‍दी करण्‍यात होत आहे. मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्‍हाधिकारी (महसू), सर्व उपविभागीय अधिकारी यांची कार्यालये, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या कार्यालयात याद्यांची प्रसिद्धी करण्यात येईल. सर्व मतदान केंद्रस्‍तरीय अधिका-यांकडे संबंधित भागाची अंतिम मतदार यादी उपलब्‍ध राहील.

        अंतिम मतदार याद्यांचे अवलोकन करुन आपले नाव मतदार यादीमध्‍ये असल्‍याची खात्री सर्व मतदारांनी करावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणुक अधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे.

        विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार

 28-अकोट विधानसभा मतदारसंघात 1 लाख 59 हजार 494 पुरूष, 1 लाख 46 हजार 968 महिला, इतर 4 असे एकूण 3 लाख 6 हजार 466 मतदार आहेत.

29-बाळापूर मतदारसंघात 1 लाख 57 हजार 915, 1 लाख 48 हजार 590 स्त्रिया, एक इतर असे एकूण 3 लाख 6 हजार 506 मतदार आहेत.

30-अकोला (पश्चिम) मध्ये 1 लाख 72 हजार 840 पुरूष, 1 लाख 72 हजार 587 स्त्रिया, 23 इतर असे एकूण 3 लाख 45 हजार 450 मतदार आहेत.

31-अकोला पूर्व मतदारसंघात  1 लाख 78 हजार 847 पुरूष, 1 लाख 71 हजार 331 स्त्रिया, 16 इतर असे एकूण 3 लाख 50 हजार 194 मतदार आहेत.

32- मूर्तिजापूर मतदारसंघात 1 लाख 57 हजार 555 पुरूष, 1 लाख 49 हजार 291 स्त्रिया, 5 इतर असे एकूण 3 लाख 6 हजार 851 मतदार आहेत.

 

००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज