गुलाबी बोंड अळीचे असे करा व्यवस्थापन

 

 

 

 

बार्शिटाकळी तालुक्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव

बोंडअळीचे वेळीच करा निर्मूलन

-        जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे

अकोला, दि. 12 : बार्शिटाकळी तालुक्यातील दोनद खुर्द, दोनद बु., अंजनी बु., बार्शिटाकळी आदी ठिकाणी कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्याचे कृषी अधिका-यांच्या पाहणीत आढळून आले आहे. त्यावर वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यातील पेरणी असेल तर पीक तपासा

कृषी विभागाचे उपसंचालक, एसएओ, तालुका कृषी अधिका-यांनी नुकतीच बार्शिटाकळी तालुक्याची पाहणी केली. त्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरलेल्या व सध्या फुले, पात्या, लहान बोंडे असलेल्या पिकात गुलाबी बोंडअळी आढळली. चिमलेल्या व डोमकळीसदृश प्रत्येक फुलात गुलाबी बोंडअळी आढळली. असे फूल अलगदपणे निघून येते. हा प्रादुर्भाव 10 ते 20 टक्के असल्याचे निरीक्षण आहे. ज्या शेतक-यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली असेल त्यांनी पीक तपासावे. इतरही भागात फुले अवस्थेत असणा-या कपाशी पिकावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेळीच उपाययोजना कराव्यात, असे ‘एसएओ’ श्री. किरवे यांनी सांगितले.

ज्या भागात कपाशीचे पीक 50 ते 60 दिवसांचे आहे, तिथे फुले लागण्यास सुरूवात झाली आहे. या अळीची मादी उमलणा-या फुलांच्या खालच्या बाजूला एकेरी अंडी घालते. त्यातून सूक्ष्म अळ्या फुलांत शिरतात व उमलणा-या पाकळ्या आतून तोंडातील धाग्याच्या सहाय्याने बंद करून अळी फुलावर उपजिविका करते. अशा फुलांना डोमकळी म्हटले जाते. ही फुले गळून पडतात.

·     त्यामुळे शेतक-यांनी पीक उगवल्यावर 35 ते 40 दिवसांपासून दर 15 दिवसांनी निंबोळी अर्क किंवा ॲझेटिरेक्टिन 3000 पीपीएम 40 मिली प्रति 10 लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. पीक उगवल्याच्या ४० ते ४५ दिवसांनतर फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा वापर करावा. सापळे पिकापेक्षा  किमान एक फुट उंचीवर लावावेत, जेणेकरून फेरोमेन (कामगंध) सापळ्यांचा प्रभाव वातावरणात पसरण्यास मदत होईल. यासाठी एकरी दोन किंवा हेक्टरी पाच फेरोमेन सापळे लावावेत. सतत तीन दिवस या सापळ्यामधे आठ ते दहा पतंग आढळल्यास गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनाचे उपाय योजावेत तसेच मास ट्रॅपिंग करीता हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे लावावेत. पिकातील डोमकळ्या नियमित शोधून त्या अळी सहीत नष्ट कराव्या म्हणजे पुढील पिढ्या रोखता येती, असे श्री. किरवे यांनी सांगितले.

 

गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक आठवड्याला एकरी शेताचे प्रतिनिधित्व करतील अशी २० झाडे निवडून निवडलेल्या प्रत्येक झाडावरील फुले, पात्या व बोंडे संख्या मोजून त्यात गुलाबी बोंड अळीग्रस्त फुले, पात्या व बोंडे यांची टक्केवारी काढावी व प्रादुर्भावग्रस्ताची टक्केवारी ५ टक्के पेक्षा जास्त आढळल्यास रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

पिक उगवणीनंतर ५५ ते ६० दिवसांनी १२ ते १५ दिवसांच्या अंतराने ट्रायकोग्रामा टॉयडीयाबॅक्ट्री किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रति 10 लीटर याप्रमाणे फवारणी करावी.  

फुलांमध्ये 5 टक्के प्रादुर्भाव आढळल्यास क्विनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मिली, किंवा क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मिली प्रति 10 लीटर पाणी  किंवा प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही ३० मिली किंवा इंडोक्साकार्ब 15.8 टक्के 10 मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक प्रति 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

जिथे 10 टक्क्यांवर प्रादुर्भाव आहे तिथे मिश्र कीटकनाशकाची 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. क्लोरॅट्रानिलीप्रोल 9.3 टक्के आणि लॅब्डा  सायहॅलोथ्रीन 4.6  टक्के किंवा क्लोरपायरीफॉस 50 टक्के व सायरमेथ्रीन 5 टक्के किंवा इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के व ॲसीटामीप्रीड 7.7 टक्के 10 मिली अशी फवारणी करावी, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक कापूस संकलन केंद्रावर व जीनींग फॅक्टरीमध्ये १५ ते २० कामगंध सापळे लावून दर आठवड्याने पतंगाचा नायनाट करावा, असे आवाहन करण्यात आले.

०००

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज