जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करावे – जिल्हाधिकारी अजित कुंभार

 


 

जिल्ह्यात घरोघरी तिरंगा अभियान यशस्वी करावे

  जिल्हाधिकारी अजित कुंभार

           अकोला, दि. ८:  स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय उत्सव असून, नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

             जिल्ह्यात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांची ऑनलाईन बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. जि. प. सीईओ बी. वैष्णवी, महापालिका आयुक्त सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. कुंभार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत महाराष्ट्राचे अनन्यसाधारण स्थान आहे. या पार्श्वभूमीवर ‘घरोघरी तिरंगा अभियान’ व्यापक प्रमाणात राबवायचे आहे.  सर्व तालुके आणि गावांमध्ये हे अभियान विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण संकल्पनांसह राबवावे. दि.१३ ते १५ या कालावधीत घरोघर तिरंगा फडकावा. संबंधित यंत्रणांनी आपल्या विभागातील, जिल्ह्यातील ध्वजाची मागणी आणि त्याप्रमाणे मुबलक प्रमाणात ध्वजाची उपलब्धता ठेवावी. त्याचप्रमाणे,  प्रत्येक घर, त्यासोबतच शासकीय, निमशासकीय कार्यालये, खासगी आस्थापना, संस्था, संघटना कार्यालय या सर्वांना या अभियानात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. मान्यवर लोकप्रतिनिधींचा सहभाग घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करावे.

            विविध शाळा, महाविद्यालये, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान राबवावे.  अभियानानिमित्त रॅली, स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान, राष्ट्रध्वजासोबत सेल्फी, प्रतिज्ञावाचन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करावे. तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॉन्सर्ट, तिरंगा कॅनव्हास, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फी, तिरंगा ट्रीब्यूट असे विविध उपक्रम राबविण्यात यावे. विविध कार्यालयांवर रोषणाई करावी, असे त्यांनी सांगितले. 

अमृत सरोवरांची स्वच्छता, उपक्रमाबाबतही यावेळी चर्चा झाली.

   ००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज