महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरांना मुर्तिजापूर येथून प्रारंभ ;माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच आरोग्य सेवा-पालकमंत्री बच्चू कडू

















          अकोला,दि.30(जिमाका)- शासनाच्या विविध योजना आणि शासकीय आरोग्य यंत्रणेचा प्रभावी वापर करुन अकोला जिल्ह्यात महिलांच्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरांचा आजपासून प्रारंभ होत आहे. गरिबीतही स्वाभिमानाने आपल्या कुटुंबाचा गाडा ओढणाऱ्या या माय-माऊलीच्या वेदना दूर करण्यासाठीच ही आरोग्य सेवा आहे,असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनाचे (दि.31 मे) औचित्य साधुन महिलांची निःशुल्क आरोग्य तपासणी व उपचार हा  उपक्रम जिल्ह्यात आजपासून सुरु करण्यात आला. मुर्तिजापूर येथून या उपक्रमाची जिल्ह्यात सुरुवात झाली. या आरोग्य तपासणी शिबिरास महिलांना गावांतून आरोग्य यंत्रणेमार्फत प्राथमिक तपासणी करुन तालुकास्तरावरील उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आणण्यात आले. येथे त्यांची सर्व तज्ज्ञांमार्फत तपासणी, निदान व अनुषंगिक उपचार करण्यात येत आहेत. या शिबिरात स्त्रियांचे विविध आजार, कर्करोग, रक्ताचे विकार, त्वचा विकार, किडनीचे आजार, हाडांचे विकार, दातांचे विकार या सह विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास जिल्हास्तर वा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयस्तवरही आवश्यक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतील. येथेही उपचार शक्य नसल्यास मुंबई वा अन्य मोठ्या शहरात नेऊन मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

या उपक्रमाचे उद्घाटन मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या कार्यक्रमास पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह आ. हरिष पिंपळे,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमती तरंगतुषार वारे, सहायक कामगार आयुक्त राजू गुल्हाणे तसेच तालुका आरोग्य अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

शिबिराच्या उद्घाटनास पालकमंत्री कडू यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पालकमंत्री कडू यांनी विभागनिहाय जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यांच्या तपासणी व उपचार सुविधांची माहिती घेतली. आरोग्य तपासणीसाठी आलेल्या सर्व महिलांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिली.

आपल्या संबोधनात पालकमंत्री म्हणाले की, या आरोग्य तपासणीत काही आजार असल्याचे निदान झाल्यास त्यावर पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येईल. सर्व महिलांचे आरोग्य उत्तम असावे या हेतूने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येईल. त्यातून महिलांच्या आरोग्याची तपासणी होत राहिल. निव्वळ पैशांअभावी दुखणं अंगावर काढत महिला वेदना सहन करत आपलं आयुष्य जगत राहतात.  याच वेदना दूर करण्यासाठी हा आरोग्य सेवेचा उपक्रम आहे.

या आयोजनासाठी झटणाऱ्या आरोग्य विभागाचे अधिकारी- कर्मचारी, आशा सेविका या साऱ्यांचे पालकमंत्री कडू यांनी कौतूक केले.

00000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ