शेतकऱ्याची युक्तीः ‘बोरु’ ने राखली ‘केळी’ : दगड पारव्यातील वनस्पती सहचर्याचा यशस्वी प्रयोग

 













          अकोला,दि.23(जिमाका)-  निसर्ग सहचर्य शिकवतो. अनेक प्राणी, वनस्पती हे परस्पर सहचर्यातून परस्परांची जोपासना करीत ‘ जिओ और जिने दो’, या उक्ती प्रमाणे एकमेकांचा उद्धार करुन घेतात. असेच वनस्पतींमधील सहचर्याचा अनोखा प्रयोग दगड पारव्यातील  शेतकऱ्यांनी केला आहे. उन्हाळी केळीची रोपे भर उन्हाळ्यात बोरुच्या झुडुपांच्या सहाय्याने यशस्वीरित्या जगवली आहेत.

केळी लागवड आणि ती ही भर उन्हाळ्यात. मात्र दगड पारव्याचे शेतकरी गजानन पुंडलिक कावरे, शंकर उत्तम कावरे यांनी मार्च महिन्यात केळीची लागवड करावयाचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आठ दिवस आधी आपल्या शेतात बोरुची झाडे लावली. आठ दिवसांच्या या रोपांच्या आत मग केळीचे रोप लागवड केले.

‘केळी’च्या संरक्षणासाठी ‘बोरु’ची लागवड

त्यामुळे केळीच्या एका रोपाच्या उत्तरेस बोरुच्या रोपांची एक रांग तर दक्षिणेस दुसरी रांग असे प्रत्येक केळी रोपास संरक्षण मिळाले. त्यांना पाण्यासाठी ठिबकची सोय केली. जस जसा एप्रिल आणि आत्ताचा मे महिना आला आणि सूर्य आग ओकू लागला त्यावेळी केळीची लहान लहान रोपे हमखास करपण्याची शक्यता निर्माण झाली. 44 व 45 अंश सेल्सियस पर्यंतच्या उच्चांकी तापमानात या लहानग्या रोपांचा टिकाव लागणे शक्य नव्हते. अशा वेळी बोरुच्या रोपांनी केळीच्या रोपावर आपले आच्छादन धरले. केळीच्या रोपांच्या वाटेचे उन्हं  बोरुने अंगावर धरले आणि केळीच्या रोपांची उन्हापासून राखण केली.

स्वस्त पर्याय ‘बोरु’

याठिकाणी गजानन कावरे यांनी चार एकर क्षेत्रात 6000 केळी रोपांची लागवड केली आहे. एकरी 1500 रोपे याप्रमाणे  ही रोपे 5 फुट बाय 6 फुट या अंतरावर लावण्यात आली आहेत. उन्हाळ्यात केळी लागवड करतांना केळीच्या रोपांचे वाढत्या तापमानात जोपासना करणे हा एक कठीण भाग असतो. त्यासाठी शेडनेट हा खर्चिक पर्याय आहे, पण तो आर्थिकदृष्ट्या न परवडणारा. म्हणून बोरुची रोपे कामी आली.

बहुगुणी ‘बोरु’

बोरुची रोपे उन्हाळ्यात केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करतात. आता पाऊस सुरु झाल्यावर बोरुची रोपे काढून टाकली जातील व त्याच जमिनीत त्यांचे हिरवळीचे खत तयार केले जाईल, जे केळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक ठरेल. हाच प्रयोग शेजारचे शेतकरी शंकर कावरे यांनीही केला. त्यांच्या शेजारी असणारे तुकाराम घोगरे यांनी हाच प्रयोग टरबूज पिकासाठी केला. त्यांनाही तो फायद्याचा ठरला.

वेगवान वाऱ्यांचा सामना करेल ‘सावरा’

याच धर्तीवर,आता जेव्हा केळीची झाडे मोठी होतील आणि त्यांना वादळ वाऱ्याचा सामना करावा लागेल, अशावेळी खोडात कमकुवत असणारी केळीची झाडे मोडण्याची वा मुडपण्याची शक्यता असते. त्यामुळे वाऱ्याचा वेग नियंत्रित रहावा यासाठी शेताच्या कडेने (विशेषतः दक्षिण व पश्चिम दिशेने) सावऱ्याची झाडे लावण्यात आली आहेत. ही झाडे ओळीने सरळ रेषेत मोठी होऊन केळीच्या झाडांकडे येणारे वेगवान वारे स्वतःच्या अंगावर घेतील आणि केळीचे संरक्षण करतील. या शिवाय सावऱ्याच्या सरळ सरळ काठ्या बांबूला पर्याय म्हणून वापरता येतात. केळीच घड लगडल्यावर झाडाला टेकू लावण्यासाठी याच सावऱ्याच्या काठ्यांचा वापर केला जातो, हे सगळं शेताच्या बांधावर आणि सहज उपलब्ध होते.

वनस्पतींच्या परस्पर सहचर्याचा हा कल्पक वापर, दगड पारव्याच्या शेतकऱ्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. त्यामुळे उत्पादन खर्चात आपोआपच बचत झाली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ