पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिलाच प्रयत्न: घरगुती बियाणे विक्री महोत्सव दि.1 जून पासून

 अकोला दि.23 (जिमाका) पालकमंत्री ओमप्रकाश बच्चु कडू यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिलाच प्रयत्न असलेला ‘घरगुती बियाणे विक्री महोत्सव’ जिल्ह्यातील प्रत्येक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात  बुधवार दि. 1 जून ते मंगळवार दि.7 जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी कळविले आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, या बीज महोत्सवात वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ यांना विक्रीकरीता सहभागी होता येईल. ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध नाही त्यांचेसाठी घरचे उत्पादीत केलेले दर्जेदार बियाणे विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. शेतकरी बांधवांकडील सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, कांदा, भुईमुंग, भाजीपाला व इतर बियाणे वाजवी दरात उपलब्ध राहणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपल्या जवळील बियाणे विक्री करावयाची आहे, त्यांनी कृषी सहाय्यक/ कृषी पर्यवेक्षक / मंडळ कृषी अधिकारी/तालुका कृषी अधिकारी यांचेकडे नोंदणी करावी. त्यांची दि.24 व 25 मे 2022 दरम्यान ट्रेमध्ये उगवणशक्ती तपासणी प्रात्यक्षीक घेण्यात येईल. हा ट्रे विक्री महोत्सवामध्ये पाहणीसाठी आणावा,असे कळविण्यात आले आहे.

या महोत्सवाकरीता अनेक स्टॉल्स लावण्यात येणार आहे. तसेच, महोत्सवामध्ये स्पायराल सेपरेटर उपलब्ध असणार आहे. ज्या शेतकऱ्यांना प्रतवारी करावयाचे आहे त्यांनी प्रतवारी करून घेवू शकता. बीजप्रक्रियेसाठी ड्रमची व्यवस्था व औषध उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना बीजप्रक्रिया करून पाहिजे त्यांना वाजवी दरात बीजप्रक्रिया करून बियाणे मिळणार आहे. तसेच, जैविक बीजप्रक्रियेसाठी स्टॉल उभारण्यात येणार असून गरजेनुसार विविध जैविक बीजप्रक्रिया साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी विविध विषयांवर प्रशिक्षण व मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. ही नाविन्यपूर्ण संकल्पना महाराष्ट्रात पहिल्यांदाच अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी बियाणे उत्पादीत करून ठेवले आहे त्यांनी बियाणे विक्रीसाठी आणावे. तसेच ज्या शेतकऱ्यांकडे बियाणे नाही त्यांनी या महोत्सवामध्ये खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम