उड्डाणपुलाचे लोकार्पण: अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संपूर्ण सहकार्य-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 












          अकोला,दि.28(जिमाका)- शहराच्या व जिल्ह्याच्या विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य असते.रस्ते विकास, जलसंधारण, शेती-व्यापार विकास यासर्व प्रश्नांची सोडवणूक करतांनाच अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण संपूर्ण सहकार्य करु, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अकोलेकरांना दिले.

अकोला शहरातील उड्डाणपूलांचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हा सोहळा अकोला क्रिकेट क्लबच्या मैदानावर पार पडला. या जाहीर कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू, विधान परिषद सदस्य आ. डॉ. रणजीत पाटील, आ. वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, आ. प्रकाश भारसाकळे, आ. हरिष पिंपळे, आ. रणधीर सावरकर, आ. आकाश फुंडकर  तसेच जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे राजीव अग्रवाल आदी अधिकारी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्याच्या विकासात अमरावती ते चिखली हा महामार्ग मोठी मोलाची भुमिका बजावणार आहे, असे सांगून त्यांनी या महामार्गालगत ट्रान्सपोर्ट हब तयार करण्यात यावे असे सांगितले. अकोला ही व्यापाराची नगरी आहे. येथे शेती, उद्योग याद्वारे कृषी व ग्रामीण क्षेत्रात रोजगार निर्मिती करण्यास भरपूर वाव आहे. अमरावती चिखली या महामार्गाचे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यात असणारा अकोला ते अकोट हा मार्गही लवकरच पूर्ण होईल.  अकोला जिल्ह्यातील कापूस हा बांग्ला देशात पाठविण्यासाठी वाहतुक मार्गात बदल केला व तो आता कमी केल्याने नदीजल मार्गाद्वारे ही वाहतुक होईल आणि सूत व कापूस मालवाहतुकीच्या खर्चात बदल झाल्याने कृषी क्षेत्राला भरारी येईल,असेही गडकरी म्हणाले.

अकोला जिल्ह्यात येत्या काळात बार्शी टाकळी ते अकोला येथे रेल्वेमार्गावर पूलास तसेच पूर्णानदीवर काटीपाटी येथील पुलासही मंजूरी देत असल्याची घोषणा यावेळी ना. गडकरी यांनी केली. जिल्ह्यात रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी कृषी, उद्योग  या सोबतच भविष्यात जलसंधारणाच्या माध्यमातून शेतकरी स्वतः इंधन तयार करुन समृद्धीचा मार्ग स्विकारतील व विदर्भ सुजलाम सुफलाम होईल,असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

चिखलदरा-नरनाळा-शेगाव महामार्ग व विमानतळाचा प्रश्न मार्गी लावा- बच्चू कडू

नितीन गडकरी यांचे कामाचे नियोजन अति सूक्ष्म असते. त्यामुळेच एकीकडे महामार्गाचे काम करत असतांना शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. खरे तर त्यांना ‘महामार्ग सम्राट’ अशी पदवी द्यायला हवी अशा शब्दात पालकमंत्री बच्चू कडू यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. अकोला जिल्ह्यासाठी मोर्णा नदीचे सौंदर्यीकरण, चिखलदरा- नरनाळा ते शेगाव असा नवा महामार्ग तयार करावा तसेच अकोला विमानतळाचा प्रश्न मार्गी लावावा,अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आ. रणधीर सावरकर यांनी जिल्ह्याच्या वतीने विविध मागण्या मांडल्या. आ. गोवर्धन शर्मा यांनी ना. गडकरी यांच्या कार्याचे कौतूक आपल्या भाषणातून केले. सूत्रसंचालन सिद्धार्थ शर्मा यांनी तर आभार विजय अग्रवाल यांनी मानले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ