आजपासून (दि.1 जून) बियाणे महोत्सवास प्रारंभ; 826 शेतकऱ्यांनी केली बियाणे विक्रीसाठी नोंद

 








          अकोला,दि.31(जिमाका)- पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या घरगुती बियाणे विक्री महोत्सवाचे आयोजन बुधवार दि.1 जूनपासून प्रत्येक तालुक्याच्या बाजार समितीत करण्यात आले आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांनी तयार केलेले घरगुती बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असेल तर हेच घरगुती बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी केले आहे. जिल्ह्यात तब्बल 826 शेतकऱ्यांनी या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी नोंद केली आहे. त्यासोबतच 22 शेतकरी कंपन्याही सहभागी होणार आहेत. शुभारंभाचा कार्यक्रम अकोट येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार असून अन्य तालुक्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने उद्घाटन सोहळा होणार आहे.

शेतकऱ्यांना घरगुती बियाणे स्वस्त दरात उपलब्ध व्हावे, तसेच बियाणे उत्पादक शेतकऱ्यांना  आपल्याकडील बियाणे विक्री करता यावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोस्तवाचा शुभारंभ पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते बुधवार दि.1 जून रोजी सायंकाळी पाच वा. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे होणार आहे. अन्य तालुक्यातील शुभारंभही व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होईल. या बियाणे महोत्सवात अधिकाधिक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, या प्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. मुख्य सोहळा अकोट येथे होणार असून स्थानिक पातळीवर आमदार महोदय सहभागी होतील. मुख्य सोहळ्यात अकोट येथे पालकमंत्री बच्चू कडू यांच्या समवेत विधानपरिषद सदस्य आ. अमोल मिटकरी,  विधानसभा सदस्य आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन  कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक  गजानन पुंडकर यांनी केले आहे.

या नियोजनाबाबत अधिक माहिती देतांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत म्हणाले की, जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करुन जनजागृती करण्यात आली. या महोत्सवात बियाणे विक्री करण्यासाठी 826 शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. तर 22 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नोंद केली आहे. त्यात अकोला येथे 113, बार्शी टाकळी येथे 150, मुर्तिजापूर येथे 92, पातुर येथे 76, बाळापूर येथे 120, तेल्हारा येथे 150, अकोट येथे 125 असे एकूण 826 शेतकरी तर जिल्ह्यात एकूण 22 शेतकरी कंपन्या अशा एकूण 848 जणांनी नोंदणी केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना बियाणे विक्रीसाठी 284 स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.  या महोत्सवात सोयाबीन, तुर, उडीद, मूग,कांदा, भाजीपाला पिके इ. बियाणे विक्रीसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी स्थानिक पातळीवर नियोजन करण्यात आले आहे.

आता पेरणीचा हंगाम जवळ आला आहे. मान्सुनही बऱ्यापैकी जवळ आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी  या महोत्सवात आपल्या जवळील बियाणे विक्री करावे व ज्यांना आवश्यकता आहे त्यांनी ते खरेदीही करावे.

या महोत्सवात बियाणे प्रक्रिया करणे, त्यात रासायनिक व जैविक प्रक्रिया करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिकेही दिली जाणार आहेत. विक्री करावयाचे बियाणेही उगवण क्षमता तपासूनच विक्रीसाठी आणण्यात येतील, याचे नियोजन आहे. बियाणे उगवणीचे प्रात्यक्षिकही विक्रीच्या ठिकाणी दिले जाईल,असेही डॉ. खोत यांनी सांगितले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ