ऐन मे महिन्यात शेततळ्यात पाणी... पाहुन सुखावले गडकरी

 







          अकोला,दि.28(जिमाका)- मे महिना सरत आलेला, तसा सगळीकडे पाण्याचा ठणठणात असण्याचा काळ, पण या कालावधीतही (दि.28 मे) डॉ.पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापूर येथील प्रक्षेत्रावर साकारलेल्या शेततलावात भरपूर पाणी पाहून दस्तूरखुद्द  केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी सुखावले. तसे त्यांनी नंतरच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलूनही दाखवले

अमृत सरोवर योजनेअंतर्गत डॉ.पंजाबराव  देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणीरंभापूर व बाभुळगाव या प्रक्षेत्रात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सहकार्याने शेततळे निर्माण करण्यात आले आहे. या शेततळ्याची पाहणी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. यावेळी वणी रंभापूर तलावात जलपूजन करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते. या पाहणी व भेटी प्रसंगी विधानपरिषद सदस्य डॉ. रणजीत पाटील,आ.अमोल मिटकरी, वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आ. गोवर्धन शर्मा, हरिष पिंपळे, प्रकाश भारसाकळे, रणधीर सावरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगूरु डॉ. विलास भाले, महाराष्ट्र पशू विज्ञान व मत्सविज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ. आशिष पातुरकर, जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता व्दिवेदी, उपप्रादेशीक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे विविध विभागाचे विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

            देशातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये 75 अमृत सरोवरांची निर्मितीची मोहिम राबविण्यात  येत आहे. याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात पाण्याचे स्त्रोत वाढावे याकरीता राष्ट्रीय माहामार्गाच्या माध्यमातून शेततळे निर्माण करण्यात आले. त्यातून महामार्गाच्या कामाला लागणारे गौण खनिजाचा वापर करण्यात आला. कृषी विद्यापीठ व पशू विज्ञान व मत्सविज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात 30 शेततळे निर्माण होत असून या प्रक्षेत्राला शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध होणार आहे. शेततळ्याच्या सभोवतालच्या गावांत  जलसाठ्यात वाढ होवून सिंचन क्षेत्रात वाढ झाली आहे. शिवाय जलसमृद्धी आली आहे. हातपंप, विहिरी जिवंत झाल्या आहेत. भर उन्हाळ्यातही त्यात पाणीसाठा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या प्रक्षेत्रात शेततळ्याच्या निर्मितीमुळे सहाशे हेक्टर जमीन ओलीताखाली आणणे शक्य झाले असून हरभरा, करडई पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. यामुळे उत्पादनात वाढ होवून उत्पन्न वाढले आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

00000  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ