मान्सुनपूर्व तयारी आढावा : समन्वय, संपर्क आणि सतर्कतेने काम करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा

 





अकोला दि.13(जिमाका)- पावसाळ्यातील अतिवृष्टी, वादळ, विजा कोसळणे यासारख्या नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी तसेच आपत्ती दरम्यान व आपत्तीनंतर मदत व बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय, संपर्क राखावा व सतर्क राहून काम करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात आज मान्सुनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, पोलीस उपअधीक्षक(गृह) शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तुंगारतुषार वारे, महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी, मनपाचे अधिकारी,  गटविकास अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसनाशी संबंधित सर्व यंत्रणा उपस्थित होत्या.

जिल्ह्यातील मान्सुन व त्याअनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यात माहिती देण्यात आली की, जिल्ह्यात  जून ते सप्टेंबर या कालावधीत 693.7 मि.मी इतके पर्जन्यमान अपेक्षित असते. जिल्ह्यात्लगु, मध्यम व मोठे असे मिळून 38 प्रकल्प आहेत.  तथापि, अतिवृष्टी, नद्यांच्या पाणलोटक्षेत्रात अतिवृष्टी होऊन मुख्य नद्यांमध्ये प्रवाह येणे, धरणे पूर्ण भरल्याने विसर्गामुळे पुर येणे यासारख्या कारणांमुळे पूरस्थिती  निर्माण होत असते. अशा स्थितींच्या वेळी सर्व यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा देणे, पूर बाधित गावांमध्ये मदत बचाव कार्याची सज्जता ठेवणे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविणे इ. उपाययोजना कराव्या,असे सांगण्यात आले. अशावेळी वीज पुरवठा खंडीत होत असतो, तो शक्य तितक्या लवकर पुर्ववत करण्यासाठी नियोजन करावे. वादळामुळे झाडे कोसळतात, त्यांना हटविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवणे याबाबत निर्देश देण्यात आले. जिल्ह्यात एकूण 77 गावे  पूरबाधीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

            सर्व स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हास्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात यावा. तालुकास्तरावरील नियंत्रण कक्षावरुन घडलेल्या आपत्तीची वा स्थितीची माहिती तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षास देण्यात यावी. तसेच गावनिहाय तालुकास्तरावरुन आपत्तीत मदत करणाऱ्या व्यक्ति, संस्था यांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी, जेणे करुन नियोजन शक्य होईल,असेही यावेळी सांगण्यात आले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ