विशेष लेखः- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला: दर्जेदार व्यावसायिक प्रशिक्षणाची अखंडीत परंपरा

            

















महाराष्ट्रातील व्यवसाय प्रशिक्षण देणारी नामांकित  अग्रणी शासकीय संस्था, स्थापना दिनांक 3 जून 1958 असून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने स्थापनेपासूनच दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्याची परंपरा अखंडीतपणे जोपासली आहे. संस्थेतून औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण करून प्रशिक्षणार्थी भारताच्या शासकीय, निमशासकीय, तथा खाजगी आस्थापनेत आपले योगदान देत असून देशाच्या औद्योगिक विकासात आपला वाटा उचलत आहेत .  

              भारतीय रेल्वे , भारत हेवि इलेक्ट्रिकल्स (BHEL), भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), आयुध निर्माणी, हिंदुस्तान एरोनॅटिक्स्, इ . तसेच टाटा  समूह  अशा नामांकीत संस्थांत काश्मीर  पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून इटानगर पर्यंत ह्या संस्थेतून  प्रशिक्षित झालेले तरुण नोकरी करीत आहेत.

               सन  1958 पासून कार्यरत असणाऱ्या संस्थेची शिस्त आणि कार्यपद्धतीचा दर्जा आजही कायम आहे.                                         संस्थेत एकूण 24 रोजगाराभिमुख  व्यवसाय असून त्यात 09 व्यवसाय एक वर्ष मुदतीचे आहेत तर  इतर 15 व्यवसाय दोन वर्षे मुदतीचे आहेत. व्यवसाय प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हमखास रोजगार व स्वयंरोजगारची संधी निर्माण होते                     www.dvet.gov.in   या  संकेत स्थळावर अधिकृत  सविस्तर माहिती प्रसारित  करण्यात  येते. प्रवेश प्रक्रिया दहावीच्या निकालानंतर ऑनलाईन पद्धतीने सुरू होते. प्रवेशासाठी पात्रता  दहावी पास /नापास अशी असून गुणवत्तेच्या आधारावर ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यासाठी अधिकृत घोषणा www.dvet.admission.gov.in वर दहावीच्या निकालांच्या घोषणेनंतर करण्यात येते .

                       संस्थेतील प्राचार्य, उपप्राचार्य ,गटनिदेशक ,निदेशक हे  नेहमीच प्रशिक्षणाचा दर्जा तसेच नवीन तंत्रज्ञानाचा आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा प्रशिक्षणात अंतर्भाव करून प्रशिक्षण दर्जेदार कसे होईल यावर सतत चर्चा करून निर्णय घेत असतात. ह्या संस्थेत गटनिदेशक म्हणून कार्यरत असलेले मंगेश पुंडकर यांना त्यांनी प्रशिक्षणात नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून नवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून दर्जेदार प्रशिक्षण देण्याच्या योगदानाबद्दल राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय कौशलाचार्य’ पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे. मंगेश पुंडकर यांचेसह इतर गटनिदेशकांचे अमूल्य मार्गदर्शन इतर शिल्पनिदेशक यांना नेहमीच मिळत असते.

                    संस्थेचे प्राचार्य पी. एन . जयस्वाल हे असून उपप्राचार्य एस आर ठाकरे आहेत. संस्थेने राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकोपयोगी कामे केली आहेत. जसे वेल्डिंगची कामे, छोटी बांधकामे ,इलेक्ट्रिक फिटिंग, सार्वजनिक इमारती ,शाळा ,ग्रामपंचायत कार्यालय यांची रंगकामे करून प्रशिक्षणार्थी यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्यात व उत्तम नागरिक घडवण्यात संस्था अग्रेसर आहे. संस्थेच्या परिसरात भरपूर वृक्षारोपण करण्यात आले असून संस्था परिसर पर्यावरणपुरक  करण्यासाठी प्रशिक्षणार्थी आणि कर्मचारी यांनी श्रमदानाने योगदान दिले आहे .

                                      संस्थेत जिल्हास्तरावरील तंत्रप्रदर्शन आयोजन करण्यात येते त्यातून प्रशिक्षणार्थिंमध्ये संशोधनवृत्ती वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्यात आले आहे. औष्णिक विद्युत केंद्र ,पारस यांनी आयोजित केलेल्या तंत्र प्रदर्शनात संस्थेने  प्रथम पुरस्कार प्राप्त केला. त्यात संस्थेतील ‘टर्नर’  ह्या व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी  यांनी संस्थेचे प्रतिनिधीत्व केले. राष्ट्रीय प्रशिक्षणार्थी कौशल्य स्पर्धेमध्ये ‘मेसन’ ह्या व्यवसायाचा प्रशिक्षणार्थी अतिबउल्लाह खान राज्यात द्वितीय  क्रमांक मिळवून यशस्वी झाला. तसेच राज्य निदेशक कौशल्य स्पर्धेत संस्थेचे टर्नर व्यवसायाचे शिल्प निदेशक संदीप पिसे यांनाही राज्यात द्वितीय क्रमांक मिळाला. क्रीडा स्पर्धांमधे देखील संस्थेतील प्रशिक्षणार्थी अव्वल आहेत.

                                   संस्था प्रशिक्षणार्थ्यांना  ऑन जॉब ट्रेनिंग (OJT)सारखी योजना देखील प्रभावीपणे राबवित असून त्यात प्रशिक्षणार्थ्याना प्रत्यक्ष कारखान्यात/उद्योग आस्थापनेत काम करण्याचा अनुभव येतो. कर्मचाऱ्यांची देखील प्रशासकीय प्रशिक्षणासाठी निवड करून त्यांच्यादेखील कार्यक्षमता वाढीसाठी संस्थेने विशेष लक्ष दिले आहे.

                              जागतिकस्तरावर आय.टी.आय.चे प्रशिक्षणार्थी यांचा दर्जा वाढीसाठी सतत प्रयत्न होत आहेत. सध्या प्रत्येक व्यवसायगटाचे अभ्यासक्रम NSQF LEVEL चे आहेत. अभ्यासक्रम शंभराहून अधिक देशांनी मान्य केला असून तरुण भारतीय तंत्रज्ञांना  जागतिकस्तरावर मोठी संधी आहे. जगभरातून कुशल तंत्रज्ञांची मोठ्या  प्रमाणात मागणी आहे; ही बाब लक्षात घेऊन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,अकोला प्रशिक्षणार्थ्यांची पूर्वतयारी करून घेत त्यांना  जागतिक आव्हाने पेलण्यासाठी सज्ज करीत आहे.

                       प्राचार्य श्री पी. एन. जयसवाल यांच्या मार्गदर्शनात संस्था येणाऱ्या काळात विकासाचा नवीन पल्ला गाठणार आहे अनेक योजना आणि प्रशिक्षणात नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत असून दर्जेदार कुशल तंत्रज्ञ तयार करून त्यांच्या दर्जेदार तुकड्या भारताच्या औद्योगिक विकासासाठी आपले योगदान देण्यासाठी सज्ज होतील.  

                    दर्जेदार व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला. कटिबद्ध असून नवीन तंत्रज्ञानासह सज्ज आहे. संस्थेत प्रवेशासाठी www.dvet.gov.In किंवा www.dvet.admission.gov.in या संकेतस्थळावर अधिकृत माहितीसाठी भेट देऊन आपले प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ,अकोला यांनी केले आहे.   

लेखक- शंतनु  वानखेडे,

शिल्पनिदेशक (क )

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,

रतनलाल प्लॉट, अकोला.

 संपर्क- 7387096783                            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ