उद्यमिता यात्रा अकोल्यात उद्योजकतेसाठी दृढनिश्चय आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

 








          अकोला,दि.20(जिमाका)-  रोजगार व उद्योगनिर्मितीकरीता शासन विविध योजनांमधून कर्ज, अर्थसहाय्य देत असते. नव्याने उद्योग सुरु करणाऱ्या नवउद्योजकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. गरज आहे ती उद्योजकतेसाठी आवश्यक असणाऱ्या दृढनिश्चयाची जोपासना करण्याची, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

            येथील श्री  शिवाजी कला,‍ वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालय येथे उद्यमिता यात्रा व तीन दिवसीय उद्योजकता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  सौरभ कटीयार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोलाचे प्रकल्प अधिकारी  राजेंद्र हिवाळे, जिल्हा उद्योग केंद्राचे महा व्यवस्थापक निलेश निकम, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त दत्तात्रय ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंबादास कुलट, उद्योजकता विकास प्रमुख  डॉ. अंजली कावरे, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल, अकोला इंडस्ट्रिज असोसिएशनचे अध्यक्ष उन्‍मेश मालू,  अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे  जिल्हा समन्वयक रोहित बारसकर, युथ एड फाऊंडेशन संस्थाचे अध्यक्ष मॅथ्यु मट्टम, उद्यमिता यात्राचे राज्य समन्वयक मनोज भोसले, दृष्टी फाऊंडेशनचे समन्वयक रोहन कासवे, महाविद्यालयाचे प्राध्यापक, नवउद्योजक आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिकारी निमा अरोरा म्हणाल्या की, आज अकोल्यात आलेल्या उद्यमिता यात्रेच्या निमित्ताने आयोजित प्रशिक्षण शिबिरामुळे मिळणाऱ्या मार्गदर्शनातून नवे उद्योजक तयार होण्यास मदत होणार आहे. तसेच उद्योगासंडर्भात असलेल्या अडचणी सोडविण्यास मदत होणार आहे. त्याचा नवउद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती अरोरा यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात उद्योग निर्मितीला पोषक वातावरण असून प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने उद्योजक होण्यासाठी पुढाकार घ्यावा. नव्या उद्योगाची सुरुवात करताना जिद्द, मेहनत, जोखीम व संयमता असणे आवश्यक आहे. केवळ स्थिरता असलेल्या रोजगाराकडे न बघता रोजगार निर्मिती करणाऱ्या उद्योगाकडे लक्ष केंद्रीत करा. शासनाकडून नवउद्योजक निर्मिती व्हावी याकरीता अनेक योजना व कर्जसुविधा दिल्या जातात. या सुविधांचा लाभ घेवून अकोला जिल्हा औद्योगिक शहर म्हणून नावलौकिकास येण्यास जिल्ह्यातील युवा उद्योजकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.  

             मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, सर्वांनी नोकरीकडे धाव न घेता उद्योग निर्माण होईल याकरीता प्रयत्न करावे. कौशल्य  विकास सोसायटी व युथ एड फाऊंडेशन संस्थाव्दारे जिल्ह्यातील नवउद्योजकांना नव्या संधी निर्माण व्हाव्या. तसेच उद्योगाबाबत मार्गदर्शनाकरीता तीन दिवसीय प्रशिक्षण आयोजीत केले आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी सौरभ कटीयार यांनी केले. युथ एड फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष मॅथ्यु मट्टम यांनी ही यावेळी विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, तीन दिवसीय  प्रशिक्षण शिबीरात युवकांचे समुपदेशन  करुन त्यांना स्वंयरोजगाराकरीता प्रेरीत करणे,  युवकांमधील नवनवीन संकल्पना, स्टार्टअपचा विकास, सुक्ष्म व्यवसाय, लघुउद्योगांना चालना, शासनाच्या विविध योजना जिल्ह्यातील युवक-युवतींपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या प्रशिक्षण शिबीराचा युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन  त्यांनी केले.

            प्रास्ताविक मनोज भोसले,सुत्रसंचालन सौरभ वाघोळे तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. अंबादास कुलट यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ