पत्रपरिषद: स्वतःसह, कुटुंब आणि समाजाच्या हितासाठी कोविड लसीकरण आवश्यक-जिल्हाधिकारी निमा अरोरा

 




अकोला,दि.(जिमाका)- कोविड लसीकरणाचे अकोला जिल्ह्यातील प्रमाण हे राज्यात सर्वात कमी आहे. तिसऱ्या लाटेचे अनुमान ही वर्तविण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी व उपयुक्त मार्ग आहे, तेव्हा ज्यांनी अद्याप लसीकरण केले नसेल अशा व्यक्तींनी आपल्या स्वतःच्या; आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या सभोवताली असलेल्या समाजाच्या हितासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.

जिल्ह्यात कोविड लसीकरण १०० टक्के करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले असून  बुधवार दि.१० ते शनिवार दि.२० या दहा दिवसांच्या कालावधीत  लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा,  उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अरोरा यांनी सांगितले की,  अकोला जिल्ह्यात कोविड लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ही ५४ टक्के आहे तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या २५.४१ टक्के आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुमानाच्या अनुषंगाने ही संभाव्य लाट थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बुधवार दि.१० पासून  विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यात शासकीय कर्मचारी हे घरोघरी जाऊन लोकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करतील, त्यांच्या आवाहनास नागरिकांनी प्रतिसाद द्यावा,असे श्रीमती अरोरा यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार म्हणाले की, या विशेष लसीकरण मोहिमेसाठी शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच अन्य ग्रामस्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील साडेचार हजार कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले असून  प्रत्येकाकडे ६० ते ७० व्यक्तींची यादी देण्यात आली आहे. त्यांना ते संपर्क करुन लसीकरण करण्याचे आवाहन करतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यासोबतच लोकांच्या सोईनुसार लसीकरण सत्र आयोजित करण्याबाबत जिल्हाप्रशासनाने नियोजन केले असून  लोकांच्या कामाच्या वेळेनुसार सायंकाळी लसीकरण सत्र आयोजित करण्याचेही नियोजन प्रशास्सनाने केले आहे.

यावेळी बोलतांना माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा म्हणाले की,  कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने  कोविड लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण न केलेल्या व्यक्तीला संसर्ग होण्याची तसेच  अशा व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो,असे त्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणास प्रतिसाद द्यावा,असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी इम्रान खान, जावेद जकेरिया, शौकत अली मिरसाहेब, सैय्यद जव्वाद हुसेन, सिद्धार्थ शर्मा, रिजाय खान लोधी आदींनी लसीकरणाबद्दल आपले अनुभव सांगत  लसीकरणासाठी लोकांना आवाहन केले व प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ