विभागीय आयुक्तांनी घेतला लसीकरण मोहिमेचा आढावा; विशेष अभियानातील गती कायम राखण्याचे निर्देश

 






अकोला, दि.१(जिमाका)- कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी १० तारखेपासून सुरु केलेल्या विशेष अभियानामुळे लसीकरणाची गती व प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हीच गती कायम राखून लसीकरणाचे काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज कोविड लसीकरणाबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, मनपा आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, आरोग्य उपसंचालक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वंदना वसो- पटोकार,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले,डॉ. अस्मिता पाठक, डॉ. मनिष शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की,  जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या (वय वर्षे १८ च्या वरील) १४ लक्ष ३३ हजार इतकी आहे. त्यापैकी ८ लक्ष ६८ हजार ८३९ लोकांनी (६०.६३ टक्के) प्रथम डोस घेतला आहे. तसेच ३ लाख ९७ हजार ९५० लोकांनी (२७.७७ टक्के) दुसरा डोस घेतला आहे. यादरम्यान एक नोव्हेंबर पासून लसीकरणाला गती आणण्यासाठी  विशेष मोहिम सुरु करण्यात आली. एक नोव्हेंबर पासून आतापर्यंत (दि.१७) १९०२ सत्र आयोजित करण्यात आले. त्यात एक लाख ८ हजार ६०८ जणांना पहिला डोस तर  ४० हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला असे एकूण १ लाख ४८ हजार ६०८ जणांचे लसीकरण करण्यात आले.

लसीकरणाला आलेली गती  ही चांगली बाब असून हिच गती कायम ठेवावी. सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. तसेच याबाबत जिल्हा प्रशासनाने केलेल्या जनजागृती उपक्रमांचेही विभागीय आयुक्तांनी प्रशंसा केली. लसीकरणासाठी आवश्यक मनुष्यबळ व लस साठा यांच्या उपलब्धतेबाबतही त्यांनी समाधान व्यक्त केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ