स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासनाचा उपक्रम: राज्यघटनेच्या अंमलबजावणीतून होईल लोकशाही समृद्ध- डॉ.पांढरपट्टे; संविधान दिनाचे औचित्यःउद्देशिका वाचन व ७५ हजार प्रतिंचे वितरण

 










अकोला, दि.२५(जिमाका)- संविधानाच्या उद्देशिकेचा प्रत्येक शब्द हा अभ्यासावा असा आहे. आपली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना असून या राज्यघटनेची अंमलबजावणी करुन लोकशाही अधिकाधिक समृद्ध होईल,असे  प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक व अकोला वाशिम बुलडाणा स्थानिक  प्राधिकारी विधान परिषद मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे केले.

संविधान दिनानिमित्त आज  जिल्हा प्रशासनामार्फत संविधान उद्देशिकेचे वाचन व ७५ हजार संविधान उद्देशिकांच्या प्रति वितरणाचा कार्यक्रम नियोजन भवनात पार पडला. या सोहळ्यास डॉ. पांढरपट्टे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती निमा अरोरा या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. तसेच  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,  उपसंचालक आरोग्य डॉ. राजकुमार चव्हाण,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये,  सहयोगी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, सहायक आयुक्त समाजकल्याण श्रीमती राठोड, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे,  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, सदाशिव शेलार, बाबासाहेब गाढवे,  बार्टीचे विजय बेदरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमास प्रारंभी मुंबई येथील (२६/११/२००८ च्या) दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना तसेच देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील व देशाच्या सिमेवर रक्षण करतांना बलिदान दिलेल्या शहिदांना स्तब्ध उभे राहून व मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.

आपल्या भाषणात डॉ. पांढरपट्टे म्हणाले की,  जगात असे अनेक देश आहेत की ज्यांची स्वतःची घटना नाही. आपली राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम राज्यघटना आहे.  या राज्यघटनेच्या उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाला व्यापक अर्थ आहे. इतिहास आहे. आपण नागरिक म्हणून या प्रत्येक शब्दावर विचार करुन अंमल करु तेव्हा आपले अनेक प्रश्न सुटलेले असतील.  तेव्हा आपण या देशाचे नागरिक म्हणून संविधाना प्रमाणे वागावे, त्यावर अंमल करावा आणि आपली लोकशाही समृद्ध करावी,असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

 कार्यक्रमाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी उद्देशिकेचे महत्त्व सांगितले, त्या म्हणाल्या की, उद्देशिकेतील आचार, कर्तव्य व सेवा हे शब्द प्रशासनातील प्रत्येक अधिकारी- कर्मचाऱ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यावर अंमलबजावणी करुन लोकांना सेवा देणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.  नागरिकांनीही आपापल्या क्षेत्रात यावर अंमलबजावणी करुन काम करावे,असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर आरोग्य, पोलीस, स्काऊट गाईड,  अंगणवाडी सेविका,  विद्यार्थी विद्यार्थिनी, शिक्षक अशा सर्व गटांतून पाच पाच व्यक्तिंना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात  संविधान उद्देशिकेचे वितरण करण्यात आले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी केले. तर सदाशिव शेलार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन किशोर बळी यांनी केले. या कार्यक्रमाला  सर्व सेवा, सामाजिक व विविध क्षेत्रातील लोक उपस्थित होते. राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता झाली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ