तूर पिकावरील मारुका अळीचे व्यवस्थापन

              अकोला,दि.(जिमाका)-  मागील पंधरवाड्यातील पावसाळी वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान हे तूर पिकावरील मारुका अळीच्या वाढीस पोषक आहे व अशा वातावरणामुळे तूर पिकाला मारुका अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी बंधूंनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवश्यक आहे, असे कृषी संचालक(विस्तार व प्रशिक्षण) ,कृषी आयुक्तालय, पुणे यांनी कळविले आहे.

                सद्यस्थितीत तूर पिकावर काही ठिकाणी मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यावर्षी चांगला पाऊसमान असल्यामुळे तूरीचे पीक चांगले आहे व हे पीक फुलोरा अवस्थेत येत आहे. शेतकरी बंधूंना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र मारुका या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

मारुका अळी-

मारुका (Maruca vetrata) ही कडधान्य पिकावरील पाने गुंडाळणारी व शेंगा पोखरणारी कीड आहे. या किडीचा पतंग करडया रंगाचा असून मागील पंखावर पांढरे पट्टे आढळून येतात. मादी पतंग कळ्या, फुले व शेंगावर अंडी घालतात. अळी पांढुरक्या रंगाची व अर्धपारदर्शक असते. तिच्या पाठीवर काळ्या रंगाच्या सहा ठिपक्यांच्या जोड्या असतात. अंड्यातून निघालेली अळी कळ्या, फुले व शेंगांना एकत्रित करून जाळ्याने चिटकून झुपके तयार करून त्या आतमध्ये राहून कळ्या, फुले खाते. तिस-या व चौथ्या अवस्थेतील अळी शेंगा पोखरून आतील दाणे खाते. अळी शेंगांच्या झुपक्यात किंवा माती मध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा जीवनक्रम १८ ते  ३५ दिवसात पूर्ण होतो.

मारुका अळी व्यवस्थापनः-

किडीच्या व्यवस्थापनासाठी जिथे तूर पीक फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. तेथे सर्वेक्षण करून शेतात २० ते २५ ठिकाणी प्रती मीटर ओळीच्या अंतरात दिसून आल्यास गरजेनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकची फवारणी करावी.

१. फ्लूबेंडामाइड २० डब्ल्यूजी ६ ग्रॅम किंवा

२. थायोडीकार्ब ७५ डब्ल्यू.पी २० ग्रॅम किंवा

३. नोवलुरोन ५.२५  इंडोक्झाकार्ब ४.५० एससी १६ मिली

              वरीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पॉवरस्प्रेने फवारणी करावी. दुसरऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकाची मात्र तिप्पट करावी. गरज भासल्यास १५ दिवसांनी दुसरी फवारणी करावी. दुसऱ्या फवारणीच्या वेळेस कीटकनाशकांची अदलाबदल करावी. उपरोक्त किटकनाशकांसोबत इतर कीटकनाशके, बुरशीनाशके, संप्रेरके, खते, अन्नद्रव्ये इत्यादी मिसळू नये. किटकनाशकांच्या शिफारशी ह्या तदर्थ स्वरुपाच्या असून शेतकरी बंधूंना तात्काळ नियंत्रणाच्या दृष्टीने प्रसारित करण्यात येत आहेत.

महत्त्वाची सुचनाः-

शेतकरी बंधूंनी फवारणी करते वेळी संरक्षक किटचा वापर करावा,असे आवाहनही करण्यात आले आहे.                                   (तांत्रिक माहिती व सहकार्य : डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला )

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम