मनमानी प्रवास भाडेवाढी विरोधात तक्रार करण्याचे आवाहन
अकोला,दि.30(जिमाका)- गर्दीच्या हंगामाचा गैरफायदा घेऊन
खाजगी बस वाहतुकदारांनी प्रवाशांकडून शासनाने निर्धारीत केलेल्या दरांपेक्षा अधिक भाडे
आकारुन मनमानी केल्यास त्याबद्दल प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे
तक्रार करावी,असे आवाहन उपप्रादेशिक
परिवहन अधिकारी विनोद जिचकार यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे त्या
त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडेदर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी
परवाना वाहनाचे त्या सवंर्गासाठी संपुर्ण बससाठी
येणाऱ्या प्रति कि.मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही,असे
कमाल भाडेदर शासनाने दि. 27 एप्रिल 2019
रोजी शासन निर्णय जारी करून निश्चित केले आहेत.
तथापि,
गर्दीच्या हंगामात खाजगी बस मालकाकडुन निर्धारित भाडेदरापेक्षा अधिक भाडे
आकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या
वतीने भरारी पथके तयार करुन त्यामार्फत वेळोवेळी तपासणी करुन खातरजमा करण्यात येते. जे खाजगी वाहतुकदार
निर्धारित दरापेक्षा अधिक दर आकारतील
त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. तरी
खाजगी वाहतुकदारांनी जास्तीचे भाडे घेतल्यास प्रवाशांनी उप प्रादेशिक परिवहन
कार्यालय अकोला येथे रितसर तक्रार नोंदवावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
विनोद जिचकार यांनी आवाहन केले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा