कोई सरहद ना इन्हे रोके....! अकोल्यात विदेशी पक्ष्यांचे आगमन,अभ्यासक-निसर्ग प्रेमींना पर्वणी
अकोला,दि.११ (जिमाका)- पंछी, नदिया, पवन
के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके....! या जावेद अख्तर यांच्या
ओळी सार्थ ठरवत विदेशी पक्षी अकोल्यात दाखल झाले आहेत. येथील काही पक्षी
अभ्यासकांनी नुकतेच अकोल्या जवळील कापशी
तलावानजिक बार हेडेड गुज अर्थात राजहंस व प्रॅटिन कोल अर्थात आर्ली या पक्षांचे
थवे पाहुन त्यास दुजोरा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पक्षीप्रेमी, अभ्यासकांना
पर्वणी ठरली आहे.
अकोला जिल्ह्यातील
पाणवठ्यांच्या जागा ही या पक्षांची आवडती ठिकाणे असतात. नुकतेच कापशी तलाव परिसरात
बार हेडेड गूज (Bar-headed Goose) या पक्षाचा
थवा पाहण्यात आला. सुमारे तीस हून अधिक संख्येने असलेल्या या थव्यात
वावरणारा हा डौलदार पक्षी पाहणे ही एक पर्वणीच असते. बदक वर्गीय
असणाऱ्या या पक्षाच्या मानेच्या वर डोक्याकडील भागात तीन काळे पट्टे असतात.
त्यामुळे त्यांना बार हेडेड असं संबोधले जाते. या संदर्भात पक्षी अभ्यासक रवी ढोंगळे म्हणाले
की, हे पक्षी मंगोलियातून इकडे अन्नाच्या
शोधात येतात. या कालखंडात तिकडे बर्फवृष्टी होत असल्याने त्यांना आवश्यक असणारे
खाद्य बर्फाच्छादित झाल्याने मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे हा पक्षी युरोपातून आशियाकडे
स्थलांतरीत होतो. त्यांना आवश्यक असतो तो जलाशय तिथं त्यांना जलक्रीडा करणे सहज
शक्य होते. शिवाय परिसरातील गवत, बिया इ. त्यांचे खाद्य हे मुबलक उपलब्ध असते.
संपूर्ण दिवस ते जलाशयाकाठीच काढतात. परंतू रात्री मुक्कामासाठी जवळपासच्या शेतात
आसरा शोधतात. तेथेही त्यांना खाद्य उपलब्ध असते. सकाळ झाली की पुन्हा जलाशया काठी
हा थवा हजर होतो. हा पक्षी सुमारे सहा ते आठ हजार फुट उंचावरुन उडत स्थलांतर करतो.
त्याच
प्रमाणे प्रॅटिन कोल हा पक्षीही अशाच थंड प्रदेशातून इकडे भक्षाच्या शोधात आलेला
आहे. या पक्षांची संख्या जादा आहे. परंतू या पक्ष्यांना विदेशी न म्हणता फारतर
परप्रांतिय म्हणावे लागेल. चिमणीपेक्षा मोठ्या आकाराचा हा पक्षी धुरकट तपकिरी
रंगाचा असतो. जलाशयाच्या किनाऱ्यावर राहून हे आपले भक्ष्य शोधत असतात. याशिवाय
येथे ग्रे हेरॉन सारखे
व स्थानिक विविध पक्षीही पहावयास मिळतात.
एकंदर सध्या पक्षीप्रेमी,
अभ्यासकांसाठी ही पर्वणी आहे. याबाबत अधिक माहिती देतांना पक्षी अभ्यासक ढोंगळे
म्हणतात की, येथे या पक्षांचे भक्ष्य उपलब्धता आहे तोवर ते इथं थांबतील.
यांच्यासोबतच मार्च पर्यंत जसजसे जलाशयातील पाणी पातळी कमी होऊन दलदलीचा भाग तयार होईल तसे
आणखीन काही वेगळ्या प्रजातीचे विदेशी पक्षी इकडे येऊ शकतात. त्यामुळे पक्षी निरीक्षणाची ही पर्वणी
अभ्यासकांनी साधावी,असे आवाहन त्यांनी केले आहे.
पक्षी निरीक्षणासाठी
घ्यावयाची खबरदारी- निसर्गाशी मिळत्या जुळत्या रंगसंगतीचा पेहराव असावा. पक्षी निरीक्षणा दरम्यान
शांतता बाळगावी. मोठ्याने आवाज करुन हातवारे करु नये. दुर्बीण सोबत असू द्यावी.
पक्ष्यांच्या अधिक जवळ जाण्याचा मोह टाळावा. आपल्या जवळील खाद्यपदार्थ पक्षांना
देऊ नये. शांतपणे निरीक्षणाची सवय अंगी बाळगल्यास पक्षांना आपल्या पासून धोका नाही
याची खात्री पडल्यास त्यांचा वावर सुकर होतो व आपल्याला अधिक चांगले निरीक्षण करता
येते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा