तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन


 यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे सध्याही जमीनीत ओल आहे, त्यामुळे तूरीचे पिक चांगले आहे. काही ठिकाणी फुलोऱ्यावर तर काही ठिकाणी शेंगा धरलेल्या आहेत. शेतकरी बंधुना तूर पिकापासुन चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.मात्र मागील दोन-तीन दिवसापासुन असणारे ढगाळ वातावरण तसेच रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक आहे. अश्या वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांपासुन नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करणे आवशक आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये खालील प्रकारच्या अळ्यांचा
समावेश होतो.
शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा):- या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तूरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३०ते ४० मि.मि. लांब पोपटी रंगाची असून पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठया अळया शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात.
पिसारी पतंग:- या पतंगाची अळी १२.५ मि.मि.लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते व बाहेर राहून दाणे पोखरते.
शेंगे माशी :- या माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही  अळी शेंगाच्या आत राहून  शेगातील दाने अर्थवट कुरतडून खाते व  त्यामुळे दाण्याची मुकनी होते.
एकात्मिक व्यवस्थापनः-  या तिनही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाकरीता  जवळ  जवळ सारखेच  उपाय  योजावे  लागतात. 
१)प्रति  हेक्टर २० पक्षी थांबे शेतात उभारावेत. त्यामुळे  पक्षी किडींच्या अळ्या खाऊन फस्त करतात.
२) तुरीच्या  झाडाखाली  पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात.
३)या शेंगा पोखरणाऱ्याळ्यांसाठी वेळीच नियंत्रणाच्या उपाय योजना न केल्यास तूर पिकाचे मोठ्या
प्रमाणात नुकसान होते. पहिली फवारणी निम किटकनाशकाची (अॅझाडिरेक्टीन
३०० पीपीएम.५०मिली/१० लिटर पाणी) करावी म्हणजे या किडीचे शत्रू किटकांना अपाय होणार नाही व नैसर्गिक संतूलन राखले जाईल. तसेच या किडी निम किटकनाशक फवारलेल्या तुरीवर अंडी घालण्यास प्राधान्य देणार नाही.
             ४) तूरी वरील शेंगा पोखरणाऱ्याळ्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यानंतर (१० टक्क  शेगांचे नुकसान किंवा १ अळी प्रति झाड) आढळल्यास विनालफॉस २० टक्के प्रवाही २० मिली/१०लिटर पाणी फवारणी करावी. त्यानंतर खालील सुचविलेल्या कोणत्याही दोन किटकनाशकांच्या १५ दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या १० लिटर पाण्यात मिसळून कराव्या- त्यात
 इमामेक्टिन बेंझोएट ५टक्के ३ ग्रॅम
लँब्डा सायहॅलोमेथ्रीन ५ टक्के प्रवाही १०मिली  
क्लोट्रॅनिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही २.५ मिली
यांचा समावेश करावा.
असा सल्ला डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे किटकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. डी.बी. उंदिरवाडे यांनी दिला आहे.
-संकलनःजिमाका, अकोला
०००००


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ