जिल्हा ग्रंथोत्सव यंदा अकोटमध्ये
जिल्हा ग्रंथोत्सव यंदा अकोटमध्ये
सोमवारी शुभारंभ; परिसंवाद, कवीसंमेलन कार्यक्रमांची रेलचेल
अकोला, दि. 6 : यंदा जिल्हा ग्रंथोत्सव अकोट येथील सांस्कृतिक कलाभवनात
दि. 9 व 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ग्रंथोत्सवात कथाकथन, परिसंवाद, कवीसंमेलन,
ग्रंथप्रदर्शन अशा कार्यक्रमांची रेलचेल असेल.
शुभारंभानिमित्त सोमवार, दि. 9 फेब्रुवारीला स. 10 वा. ग्रंथपूजन व
ग्रंथदिंडी होणार आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या हस्ते स. 11 वा. होईल. ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार
प्रतिमा इंगोले अध्यक्षस्थानी असतील. उद्घाटन सत्राला विविध मान्यवर उपस्थित राहणार
आहेत.
पहिल्या दिवशी दु. 2 वा. ‘मला जिजाऊ व्हायचं’ हा एकपात्री प्रयोग सादर
होणार असून, त्यानंतर ‘मराठी भाषेपुढील आव्हाने’ या विषयावरील परिसंवाद साहित्यिक पुष्पराज
गावंडे यांच्या अध्यक्षतेत होईल. दु. 4 वा. भाषावैज्ञानिक व व-हाडी बोलीचे अभ्यासक
रावसाहेब काळे यांच्या अध्यक्षतेत ‘सोशल मीडिया आणि वाचन’ या विषयावर परिसंवाद होईल.
मंगळवार, दि. 10 फेब्रुवारीला स. 10.30 वा. देशभक्तीपर गीतसंगीत कार्यक्रम,
स. 11 वा. ‘आजचा वाचक, उद्याचा विचारवंत’ या विषयावरील परिसंवाद, दु. 12 वा. ‘वाचन
संस्कृतीमध्ये ग्रंथालयांचे योगदान व भूमिका’ या विषयावरील चर्चासत्र होईल. दु. 2 वा.
‘आजच्या विद्यार्थ्यांपुढील आव्हाने’ या विषयावर परिसंवाद होईल. दु. 3 वा. कवी डॉ.
विठ्ठल कुलट यांच्या अध्यक्षतेत कवीसंमेलन होणार असून, प्रसिद्ध गझलकार गोपाळ मापारी
निवेदन करणार आहेत. दु. 4.30 वा. समारोपाचे सत्र होईल.
जिल्ह्यातील वाचक, रसिक, कवीलेखक, ग्रंथप्रेमी नागरिकांनी ग्रंथोत्सवात
मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. अतुल वानखडे
यांनी केले आहे.
०००


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा