महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके
महारेशीम अभियानात तुती लागवडीसाठी नोंदणी सुरू
अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घ्यावा
जिल्हा
रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके
अकोला, दि. 11 : जिल्ह्यात महारेशीम अभियानाला सुरूवात झाली असून, दि.
5 मार्चपर्यंत नवीन तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी
आपले सरकार या पोर्टलवर वस्त्रोद्योग विभाग निवडून ऑनलाईन नोंदणीचा अर्ज करण्याची सुविधा
उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन
जिल्हा रेशीम विकास अधिकारी सुनीलदत्त फडके यांनी केले आहे.
राज्यात तुती लागवड करून शेतकरी रेशीम कोष निर्मितीपासून भरघोस उत्पन्न
मिळवत आहेत. रेशीम उद्योगासाठी राज्यात अनुकूल वातावरण असल्याने या उद्योगात दरवर्षी
वाढ होत आहे. तुती लागवडीद्वारे रेशीम कोष उत्पादन करून एक एकर क्षेत्रात दुसऱ्या वर्षी
पासून दोन लक्षपेक्षा जास्त उत्पन्न महाराष्ट्रातील शेतकरी मिळवत आहेत. मोठ्या प्रमाणात
रेशीम कोष उत्पादन होत असल्याने त्यासाठी महाराष्ट्रातील जालना, बीड, बडनेरा, सोलापूर,
बारामती नागपूर या जिल्ह्यात कोश बाजारपेठ सुरू करण्यात आल्या आहेत. रेशीम उद्योगाला
दिवसेंदिवस प्रचंड प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे शासनाचे
धोरण याद्वारे साध्य होत आहे.
रेशीम उद्योगाच्या वाढीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजना (जी -राम -जी) या अंतर्गत अल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी १ एकर
तुती लागवड जोपासना आणि किटक संगोपन गृह साठी ८९५ मनुष्य दिवस तीन वर्षांमध्ये मजुरी
रु. २ लक्ष ७९ हजार २४० व साहित्यासाठी रु. १ लक्ष ५३ हजार रुपये असे एकूण चार लक्ष
32 हजार २४० अनुदान दिले जाते. तसेच केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र या योजने अंतर्गत
तुती लागवडीसाठी प्रति एकरी रु. ४५ हजार, सिंचन संचासाठी प्रति एकरी रुपये ४५ हजार,
कीटक संगोपन गृहासाठी रु २ लक्ष ४३ हजार ७५०, संगोपन साहित्यासाठी रु.३७ हजार ५०० व
निर्जंतुकीकरण औषधि साठी रु. ३ हजार ७५० असे एकूण रु. ३ लक्ष ७५ हजार अनुदान दिले जाते.
बहू- भूधारक शेतकऱ्यासाठी तुती लागवड २.०० एकर सुध्दा सिल्क समग्र -२ या योजनेतून करता
येते त्यासाठी तुती लागवड,किटक संगोपन गृह, संगोपन साहित्य व निर्जंतूकीकरण औषधि करीता
रु.५ लक्ष ६२ हजार ५०० अनूदानदिले जाते.
कृषी विभागाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत (पोकरा)
तुती लागवड करिता रु.४५ हजार रेशीम कीटक संगोपन
गृहसाठी २ लक्ष ४३ हजार ७५० व संगोपन साहित्य यासाठी रु. ३६ हजार ३७५ असे एकूण रु.
३ लक्ष २५ हजार १२५ अनुदान दिले जाते. अकोला जिल्ह्यातील १४९ गावांमध्ये पोकरा ही योजना
लागू करण्यात आली आहे. या करिता शेतकरी बंधूनी कृषी विभागाकडे ऑनलाईन अर्ज करावयाचा
आहे. तसेच मनरेगा व सिल्क समग्र योजनेसाठी नोंदणी जिल्हा रेशीम कार्यालय, प्लॉट क्र.
८,९,१० एम.आय.डी.सी फेज- I, शक्ती टायर्स जवळ, अकोला येथे संपर्क साधावा. असे आवाहन
जिल्हा रेशीम अधिकारी, अकोला यांच्याकडून करण्यात येत आहे
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा