महानिर्यात कार्यशाळेद्वारे सूक्ष्म व लघु उद्योजकांना मार्गदर्शन उद्योग विभागाचा उपक्रम
महानिर्यात कार्यशाळेद्वारे सूक्ष्म व लघु उद्योजकांना
मार्गदर्शन
उद्योग विभागाचा उपक्रम
अकोला, दि. 2 : राज्याच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान देणा-या
सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रावर भर देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्याचा उद्देश ठेवून
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे ‘महानिर्यात इग्नाईट कार्यशाळा’ आज हॉटेल आर. जी. एक्सक्लुसिव्ह
येथे घेण्यात आली.
अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते कार्यशाळेचा शुभारंभ
झाला. उद्योग सहसंचालक रंजना पोळ, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड,
संकेत निनावे, श्री. रूनालिया, श्रद्धा टेकाम, आकाश ढगे, निर्यात तज्ज्ञ अंकित गुप्ता,
अकोला औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष मनोज खंडेलवाल आदी उपस्थित होते.
राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार, स्वयंरोजगार संधी
मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम राबविणे व निर्यातवृद्धीला
चालना देणे हा कार्यशाळेचा उद्देश आहे. त्याचा स्थानिक उद्योजक बांधवांना निश्चित लाभ
होईल. उद्योग विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्री.
गायकवाड यांनी केले.
भारताच्या जीडीपीत महाराष्ट्राचा वाटा १३ टक्के आहे. उद्योग विभागाकडून
क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अशा अनेक योजना
राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात वस्त्रोद्योग, अन्नप्रक्रिया उद्योग उभे राहत असून,
पातूर तालुक्यात टिकवूड उद्योग येथे आकारास येत आहे. ग्लोबल पॉलिसी सेंटर ही महत्वाकांक्षी
योजनाही हाती घेण्यात आली असून, नव्या औद्योगिक धोरणानुसार सेवा क्षेत्र ही सबसिडीसाठी
पात्र ठरवले आहे, असे महाव्यवस्थापक श्री. बनसोड यांनी प्रास्ताविकात सांगितले.
जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण यांनी आभार मानले.
कार्यशाळेला औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजक, निर्यातदार,
नवउद्योजक, शेतकरी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा