'वऱ्हाडी जत्रा'–सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ

 




















 

'वऱ्हाडी जत्रा'–सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ

अकोल्यात साकारणार बचत गटांसाठी ‘उमेद’ मॉल

उत्पादनांमध्ये नाविन्य व वैविध्य आणणे आवश्यक

– पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 

अकोला, दि. २० : बचत गटांच्या बळकटीकरणासाठी केंद्र व राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, बचत गटांनीही उत्पादनांमध्ये नाविन्य व वैविध्य आणून अधिक ग्राहकाभिमुख होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी येथे केले.

 

ग्रामविकास व पंचायतराज विभाग, उमेद– राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातर्फे पं. लालबहादूर शास्त्री क्रीडांगण येथे 'वऱ्हाडी जत्रा'–सरस विभागीय प्रदर्शनाचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिगंबर लोखंडे, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक नरेंद्र काकड आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, जिल्ह्यात 20 कोटी रू. निधीतून उमेद मॉल निर्माण होणार असून, बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ मिळणार आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून देशात व महाराष्ट्रात बचत गटांसाठी विविध अर्थसाह्य, विपणनासाठी मदत, लखपती दीदी अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत.

महिला बचत गटांनीही काळाची गरज ओळखून उत्पादनांमध्ये बदल घडवून आणावेत. त्यासाठी बाजारपेठेचा अभ्यास करावा. इतरांचे अनुकरण न करता उत्पादनांत नाविन्य व वैविध्य आणावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

केंद्र व राज्य शासनातर्फे विविध क्षेत्रांत डिजीटल तंत्रज्ञान वाढविण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. बचत गटांनीही आपली उत्पादने देशभर पोहोचविण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असे खासदार श्री. धोत्रे यांनी सांगितले. अकोल्यात 20 कोटी रू. निधीतून उमेद मॉल साकारणार आहे. बचत गटांनी बाजारपेठेची गरज ओळखून व वेगळेपण जपून उत्पादने निर्माण करावीत. क्लस्टर डेव्हलपमेंटवरही भर देण्यात येणार असल्याचे आमदार श्री. सावरकर यांनी सांगितले.

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे विपणनाच्या दृष्टीने उत्तम पॅकेजिंग, ’ब्रँडिंग’, तसेच विश्वासार्हता वाढविण्यासाठी मानकीकरण होणे आवश्यक आहे.  असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी सांगितले. जिल्ह्यात १३ हजार ५२८ स्वयंसहायता समूह असून, ५ हजारहून अधिक विविध लघु व्यवसायांना चालना मिळाली. बचत गटांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न होत असल्याचे श्रीमती मेश्राम यांनी सांगितले.  

पालकमंत्र्यांनी प्रदर्शनातील कक्षांना भेट देऊन उत्पादनांविषयी बचत गटांच्या सदस्यांकडून जाणून घेतले. प्रदर्शनात विविध जिल्ह्यांतील बचत गटांनी निर्माण केलेल्या विविध वस्तूंची ७० व वऱ्हाडी, मराठमोळ्या खाद्यपदार्थांची ३० अशी एकूण १०० दालने आहेत. ’वऱ्हाडी जत्रा’ दि २४ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री १० सर्वांसाठी खुली राहील.

००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*