नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ महोत्सवातून पर्यटन विकासाला चालना मिळेल पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

 












अकोला, दि. १५ : स्थानिक स्तरावर रोजगार व पूरक व्यवसाय वाढण्यासाठी पर्यटन क्षेत्राचा विकास होणे आवश्यक आहे. गौरवशाली इतिहास व समृद्ध वनवैभव लाभलेल्या  नरनाळा परिसरात पर्यटन विकासाच्या अनेक शक्यता आहेत. त्याला नरनाळा महोत्सवातून चालना मिळेल, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज व्यक्त केला.

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवाचा  शुभारंभ  पालकमंत्री ॲड.  फुंडकर यांच्या हस्ते पोपटखेड रस्ता, अकोट येथे झाला. खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, अकोट नगराध्यक्ष माया धुळे, माजी आमदार संजय गावंडे, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी, पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, श्रीमती गीता परदेशी, उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, पोपटखेडचे सरपंच विजय तायडे आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, नरनाळा परिसरातील आदिवासी बांधव,  शेतकरी बांधव आदींना रोजगार, पूरक व्यवसाय पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो. त्यासाठी नरनाळा पर्यटन क्षेत्रात केंद्रस्थानी येणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने
नरनाळा महोत्सवाचा उपक्रम महत्वपूर्ण आहे. पुढील वेळी हा उपक्रम अधिक उंचीवर नेण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

नरनाळा परिसर हा वनसमृद्ध आहे. हे स्थळ पर्यटन नकाशावर केंद्रस्थानी आणणे आवश्यक आहे. पर्यटन विकासातून स्थानिकांसाठी पूरक व्यवसाय निर्माण होतील, असा विश्वास आमदार श्री. सावरकर यांनी व्यक्त केला. आमदार श्री. भारसाकळे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
श्री. परदेशी म्हणाले की, मी जिल्हाधिकारी असताना महोत्सवाची सुरुवात झाली. नवे निसर्ग पर्यटन धोरण, नवे नियम यामुळे काही काळ महोत्सव होऊ शकला नाही. आता
महोत्सवाचे पुनरुज्जीवन झाले, ही आनंदाची बाब आहे. या माध्यमातून इको हेरिटेजला चालना मिळावी.
जतन, संवर्धन व मनोरंजन अशी त्रिसूत्री अवलंबून येथील पर्यटन पुढे न्यावे, असे आवाहन त्यांनी केले.


नरनाळा किल्ल्याला 1 हजार वर्षांचा इतिहास आहे. ऐतिहासिक महात्म्य व समृद्ध वनवैभव परिसराला लाभला आहे. महोत्सवातून पर्यटन क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न आहे, असे जिल्हाधिकारी श्रीमती मीना यांनी प्रास्ताविकात सांगितले.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बोटिंग व साहसी खेळ उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला. शुभारंभाच्या कार्यक्रमानंतर स्थानिक कलावंतांनी कला सादर केली. त्यानंतर प्रसिद्ध मराठी कलावंतांचा समावेश असलेला चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम झाला. महोत्सवाला मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.
०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*