नरनाळा महोत्सवाचा दुसरा दिवस_ रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने दुसरा दिवस संस्मरणीय
नरनाळा महोत्सवाचा दुसरा दिवस_
रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने दुसरा दिवस संस्मरणीय’ *शिवशंभू गर्जना’ने सूर–तालातून जिवंत केली महाराष्ट्रीय संस्कृती व गौरवशाली इतिहास*
अकोला, दि. १६ : नरनाळा महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ’शिवशंभू गर्जना’ या कार्यक्रमाने महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जागवला. वीररसपूर्ण गाणी आणि प्रभावी सादरीकरणाने रसिकांमध्येही उत्साह, जोश संचारला. उपस्थितांनीही दोन्ही हात उंचावून, उभे राहून कलावंतांच्या सुरात सूर मिसळून, स्वतः नाचून गाऊन जोरदार दाद दिली.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात निसर्गाधारित पर्यटन उपक्रम, ’मॅराथॉन– एक धाव संवर्धनासाठी', चित्रकला स्पर्धा, पाक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सायंकाळच्या सत्रात अभिजित व अमू जाधव यांचा ’शिवशंभू गर्जना’, त्यानंतर आयडॉल विनर सलमान अली यांची लाईव्ह कॉन्सर्ट हा कार्यक्रम झाला. आमदार वसंत खंडेलवाल, माजी आमदार संजय गावंडे, जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपवनसंरक्षक राहुलसिंह टोलिया, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र मालठाणे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे बक्षीस वितरण व कलावंतांचा गौरव झाला.
अभिजीत जाधव यांनी ’शिवशंभू गर्जना’ कार्यक्रमात एकापेक्षा एक सुंदर गाणी करून रसिकांना जिंकून घेतले. कार्यक्रमाला रसिकांची मोठी गर्दी होती. महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास, संस्कृती, मराठमोळी परंपरा, येथील लोकगीते यांची गुंफण असलेला हा कार्यक्रम मोठी दाद मिळवणारा ठरला. प्रत्येक गाण्यावर हजारो उपस्थित रसिक गायकांच्या सुरात सूर मिसळून तालावर नाचत–गात होते. अभिजीतच्या भारदस्त आवाजाने आणि रसिकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने आसमंत निनादून गेले होते.
उद्या सकाळी १० वाजता कवीसंमेलन, दुपारी २ वाजता इन्व्हेस्टर्स मीट व सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलास खेर यांची लाईव्ह कॉन्सर्ट होणार आहे.
०००





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा