शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढा समाजकल्याण कार्यालयाची महाविद्यालयांना सूचना
शिष्यवृत्ती योजनांचे प्रलंबित अर्ज निकाली काढा
समाजकल्याण कार्यालयाची महाविद्यालयांना सूचना
अकोला, दि. 5 : विविध शिष्यवृत्ती योजनांचे सुमारे 3 हजार अर्ज महाविद्यालय
स्तरावर प्रलंबित असून, महाविद्यालयांनी त्याची तत्काळ पूर्तता करण्याची सूचना समाजकल्याण
सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केली आहे.
अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर
शिष्यवृत्ती, राज्य शासनाच्या शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, राजर्षी
शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिकत असलेल्या अनुसूचित
जातीच्या मुला-मुलींना निर्वाह भत्ता या योजना महाडिबीटी पोर्टल या प्रणालीद्वारे ऑनलाईन
पध्दतीने राबविण्यात येत आहेत.
सन 2022-23 मध्ये महाविद्यालय स्तरावर 231, सन 2023-24 मध्ये 94 व सन
2024-25 मध्ये 471 एवढे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. या अर्जांची महाविद्यालयाने
तात्काळ तपासणी व पडताळणी करावी. प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात यावे जेणेकरून अनु.जाती
प्रवर्गातील विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही. त्याचप्रमाणे, सन 2025-26 या
वर्षातील 2 हजार 780 महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहे. शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे
दोन महिने शिल्लक आहेत. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी गांभीर्याने नोंद घेऊन पूर्तता
करण्याचे आवाहन श्री. वाठ यांनी केले आहे.
0000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा