वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ बंजारा नृत्यकलेने केले उपस्थितांना मंत्रमुग्ध
वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाचा उत्साहात शुभारंभ
बंजारा नृत्यकलेने केले उपस्थितांना मंत्रमुग्ध
अकोला, दि. 21 : सांस्कृतिक कार्य विभागातर्फे वैशिष्ट्यपूर्ण कला महोत्सवाचा
शुभारंभ प्रमिलाताई ओक नाट्यगृहात आज झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी साखरवीरा येथील
कलावंतांच्या बंजारा नृत्यकलेच्या सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
ज्येष्ठ रंगकर्मी मधू जाधव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,
बबनराव कानकिरड, रंगकर्मी विष्णू निंबाळकर, कलावंत ललिता जाधव, प्रमोद रत्नपारखी, सचिन
गिरी, महेश इंगळे, रोशन समदुरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या
हस्ते दीपप्रज्ज्वलनाने महोत्सवाचा शुभारंभ झाला.
लोककला हे सर्व कलांचे मूळ आहे. लोककलांचे संवर्धन करण्यासाठी सर्व
स्तरांतून प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन श्री. जाधव यांनी यावेळी केले. बार्शिटाकळी
तालुक्यातील साखरवीरा येथील ललिता जाधव व सहकारी
कलावंतांनी बंजारा नृत्य सादर करून उपस्थितांची
मने जिंकली.
महोत्सवात उद्या गुरुवार दि. 22 जानेवारी रोजी प्रमिलाताई
ओक सभागृहात सायंकाळी 6.30 वा. महाराष्ट्रची लोककला, वासुदेव ,गोंधळ,भारुड कलापथक खडी
गंमत आदी सादरीकरण होणार आहे. पातूर येथील शाहीर विशाल राखोंडे व लोककवी सागर राखोंडे
संच, साने गुरुजी कला व सांस्कृतिक क्रीडा बहु.मंडळ व स्व.विनायक राखोंडे प्रतिष्ठान आदींचे 15 कलावंत कार्यक्रमात
सहभागी होणार आहेत.
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनात,
तसेच सांस्कृतिक संचालक विभीषण चवरे यांच्या नियोजनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. अकोलेकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात
आले आहे.
०००



.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा