सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान

 

 

सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान

१५ जानेवारी ते ७ फेब्रुवारीदरम्यान २१ जिल्ह्यांत राबविणार मोहीम

अकोला, दि. 9 : केंद्र शासनाच्या सिकलसेल मिशन कार्यक्रमांतर्गत २०४७ पर्यंत सिकलसेल आजाराचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अनुषंगाने ० ते ४० वयोगटातील प्रत्येक नागरिकाची सिकलसेल तपासणी करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सिकलसेल अॅनिमिया विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

या अभियानात अकोला जिल्ह्यासह ठाणे, नाशिक, नंदुरबार, अमरावती, गोंदिया, गडचिरोली, पालघर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, धुळे, जळगाव, बुलढाणा, नांदेड, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, रायगड व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

अकोला जिल्ह्यात हे अभियान जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम व उपसंचालक आरोग्य सेवा डॉ. सुशीलकुमार वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे नियोजन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.

अभियानाच्या प्रचार व प्रसिद्धीसाठी घरोघरी जनजागृती करण्यात येणार असून आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी नागरिकांपर्यंत थेट पोहोचणार आहेत. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी व शासकीय यंत्रणा यांच्या सहकार्याने ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे.

याच अनुषंगाने दि. ८ जानेवारी २०२६ रोजी ग्रामीण आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय, पातूर येथे विद्यार्थ्यांना व प्राचार्यांना सिकलसेल मोहिमेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमास जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी बाळासाहेब घुगे, विस्तार अधिकारी पांडुरंग तेलगोटे, आरोग्य सेवक दराडे उपस्थित होते. महाविद्यालय प्रशासनाने सहकार्य केले.

जिल्ह्यातील नागरिकांनी या मोहिमेची माहिती सर्व घटकांपर्यंत पोहोचवून अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा