सेवेतून भक्तीचा मार्ग * ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागम कार्यक्रमात सेवेच्या माध्यमातून साक्षीदार होवू या*

 *विशेष लेख*.             १४ जानेवारी २०२६


भारतीय इतिहासात धर्म, मानवता, त्याग आणि बलिदान यांचे अद्वितीय प्रतीक म्हणून श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचे नाव अजरामर आहे. धर्मस्वातंत्र्य, मानवमूल्ये आणि सत्यासाठी प्राणार्पण करणारे ते “हिंद-दी-चादर” म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या महान शहिदीच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात २४ व २५ जानेवारी रोजी एक भव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.


हा भव्य समागम असर्जन परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुमारे ५३ एकर विस्तीर्ण मैदानावर संपन्न होणार असून, देश-विदेशातून जवळपास १० लाखांहून अधिक भाविक या पवित्र समागम कार्यक्रमासाठी नांदेडमध्ये दाखल होणार आहेत. हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता आणि मानवतेचा महासंगम ठरणार आहे.


 *नऊ समाजांचा ऐतिहासिक सहभाग* 


या ऐतिहासिक शहीदी समागमाचे आयोजन नऊ समाजांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.


राज्य शासनाचा अल्पसंख्याक विभाग,

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी ३५० वी शहीदी समागम समिती तसेच सीख, सिकलीकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी, वाल्मिकी, उदासीन संप्रदाय आणि भगत नामदेव वारकरी समाज या सर्व समाजांनी एकत्र येत एकतेचा आणि समतेचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.


ही संयुक्त रचना स्वतःतच गुरूंच्या विचारांची जिवंत साक्ष आहे. “सर्व धर्म समान, सर्व मानव समान” हा संदेश या आयोजनातून ठळकपणे अधोरेखित होतो.


 *मुख्य मंडप, अनवाणी चालण्याची परंपरा आणि श्रद्धेचा सन्मान* 


कार्यक्रम स्थळी उभारण्यात येणाऱ्या मुख्य मंडपात दोनही दिवस श्री गुरु ग्रंथसाहिब विराजमान राहणार आहे. गुरूंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येणारे सर्व भाविक, मान्यवर, पदाधिकारी व अतिथी कार्यक्रम स्थळी अनवाणी चालणार आहेत.


ही परंपरा केवळ धार्मिक शिस्त नसून अहंकार त्याग, नम्रता आणि गुरूचरणी समर्पणाची भावना व्यक्त करणारी आहे. लाखो भाविक अनवाणी चालत गुरूच्या दर्शनासाठी येणार, हे दृश्यच सेवेतून भक्तीचा खरा अर्थ उलगडून दाखवणारे ठरणार आहे.

तसेच संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जन्म गाव नरसी नामदेव येथून वारकरी दिंड्या पायी चालत नांदेड येथे समागम स्थळी येणार आहे


श्रमदानातून उभी राहणारी सेवा संस्कृती


या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा एक अत्यंत प्रेरणादायी प्रसंग म्हणजे नुकतेच पार पडलेले भव्य श्रमदान. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम स्थळी श्रमदान करण्यात आले. मैदानावरील खडे उचलणे, जमिनीची स्वच्छता करणे, चालण्यासाठी सुरक्षित व्यवस्था करणे ही सर्व कामे सेवाभावाने करण्यात आली.


प्रशासन, विद्यार्थी,स्वयंसेवक आणि भाविकांनी एकत्र येऊन केलेले हे श्रमदान सेवेतून भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव देणारे ठरले. गुरूंच्या शिकवणीनुसार सेवा हीच खरी साधना असल्याचा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचला.


लंगर : समानतेचा आणि मानवतेचा महासागर


या भव्य शहीदी समागमात भाविकांच्या सोयीसाठी १२ भव्य लंगर उभारण्यात येणार आहेत.

प्रत्येक लंगरमध्ये एकावेळी सुमारे ३,००० भाविक बसून भोजन करू शकतील, अशी उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे.


२४ व २५ जानेवारी रोजी हे लंगर

सकाळी ८ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत अखंड सुरू राहणार आहेत.


लंगर म्हणजे केवळ अन्नसेवा नाही, तर समानतेची शिकवण आहे. येथे जात, धर्म, भाषा, देश, श्रीमंती-गरिबी यांचा कोणताही भेद न ठेवता सर्वजण एकाच पंक्तीत बसून गुरूचा प्रसाद स्वीकारणार आहेत. हा दृश्य अनुभव गुरू नानक देवजींच्या “सर्व मानव समान आहेत” या विचाराचा साक्षात्कार घडवणारा असेल.


विनामूल्य सेवा स्टॉल


कार्यक्रम स्थळाच्या चारही बाजूंनी दोन किलोमीटरपर्यंतच्या परिसरात

चहा, पाणी, नाश्ता, फळे यांचे विनामूल्य सेवा स्टॉल उभारण्यात येणार आहेत.


ही व्यवस्था लाखो भाविकांच्या सोयीसाठी असून, निःस्वार्थ सेवेचा सर्वोच्च आदर्श समाजासमोर ठेवणारी आहे. सेवा करताना कोणताही मोबदला, मान-सन्मान किंवा प्रसिद्धी अपेक्षित नसून, केवळ गुरूंच्या नावाने सेवा करण्याचा आनंद स्वयंसेवक अनुभवणार आहेत.


जुताघर : नम्रतेचा आणि अहंकारत्यागाचा संस्कार


कार्यक्रम स्थळी ८ प्रवेशद्वारांवर ८ जुताघरे उभारण्यात येणार असून, गरजेनुसार त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

लाखो भाविकांच्या पादत्राणांची काळजी घेणे ही एक मोठी जबाबदारी असून, ती सेवा अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली जाणार आहे.


जुताघर सेवा म्हणजे अहंकाराचा त्याग आणि नम्रतेची साधना. गुरूच्या दरबारात प्रवेश करताना पादत्राणे बाहेर ठेवणे म्हणजे बाह्य वैभव आणि गर्व दारातच ठेवणे होय. ही सेवा माणसाला अंतर्मुख करते आणि समानतेचा खरा अर्थ शिकवते.


गतका, परंपरा आणि शौर्याचे दर्शन


या शहीदी समागमात शीख धर्मीयांचा पारंपरिक युद्धकला प्रकार ‘गतका’ सादर करण्यात येणार आहे.

यामध्ये पारंपरिक शस्त्रांचे प्रदर्शन, शौर्य, शिस्त आणि युद्धकलेचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे.


तसेच नऊ समाजांच्या वतीने पारंपरिक कीर्तन, कथा आणि धार्मिक प्रवचनांचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातून गुरूंच्या जीवनकार्याचा आणि बलिदानाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.


या सामगमासाठी दिल्ली अमृतसर, चंदीगड, मुंबई, हैद्राबाद येथून मोफत रेल्वे सेवा राहणार असून तसेच विशेष विमानसेवा दोन्ही दिवस असणार आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी दहा हजार भाविकांच्या निवासासाठी सर्व सुविधायुक्त आदर्श टेन्ट सिटी उभी करण्यात येणार आहेत 


हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी : श्रद्धेचा अभिषेक


या ऐतिहासिक कार्यक्रमात हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.

गुरूंच्या प्रतिकृतीवर आणि भाविकांवर होणारी ही पुष्पवृष्टी म्हणजे श्रद्धेचा, सन्मानाचा आणि कृतज्ञतेचा अभिषेक असेल.



सेवेतून इतिहासाचे साक्षीदार होवू या


नांदेड येथे होणारा हा ३५० वा शहीदी समागम म्हणजे केवळ एक धार्मिक कार्यक्रम नसून, सेवा, समानता, बलिदान आणि मानवतेचा महासोहळा आहे.

“हिंद-दी-चादर” श्री गुरु तेगबहादूर साहिबजी यांचा संदेश आजही तितकाच जिवंत असून, तो या भव्य आयोजनातून संपूर्ण जगाला पुन्हा एकदा दिशा देणार आहे.तसेच या कार्यक्रमासाठी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, बागेश्वरचे आचार्य , महंत आदी उपस्थित राहणार आहे

.


चला तर मग,

या गौरवशाली ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार बनूया,

सेवेत सहभागी होऊया

आणि गुरूंच्या चरणी आपली सेवा अर्पण करण्यासाठी सज्ज होऊया.


अलका पाटील

उपसंपादक

जिमाका,नांदेड

००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा