नरनाळा महोत्सवामुळे पर्यटनाला मिळणार चालना
नरनाळा महोत्सवामुळे पर्यटनाला मिळणार चालना
सातपुड्यात वसलेल्या मेळघाटचे वनवैभव, आदिम संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी
जिल्ह्यात नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान घेण्याचे प्रशासनाचे
नियोजन आहे. या महोत्सवामुळे पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास वनपर्यटनप्रेमी, कलावंत,
अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
अकोला जिल्ह्यातील अकोट
तालुक्याच्या उत्तरेला शहानूर या छोट्याश्या गावाला लागून सातपुड्याच्या डोंगरात असलेला
नरनाळा किल्ला आहे. या ऐतिहासिक किल्ल्याकडे पर्यंटकांचे लक्ष वेधण्यासाठी महोत्सव
आयोजनाची संकल्पना पुढे आली. अकोला येथील कलावंत प्रदीप गुरुखुद्दे यांनी ही मागणी
लावून धरली. स्थानिक कलावंत, पर्यटनप्रेमी कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन दि. २६
जानेवारी ते २८ जानेवारी २००८ दरम्यान नरनाळा महोत्सवाचे पहिले आयोजन करण्यात आले.
स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा झाला. पुढे हा महोत्सव काही कारणांमुळे
होऊ शकला नाही. मात्र, आता तो पुन्हा उत्साहाने साजरा करण्यात येणार असून, ऐतिहासिक
वारसा व समृद्ध वन्यजीवन लाभलेला हा किल्ला महोत्सवाच्या माध्यमातून अनुभवण्याची संधी
सर्वांना मिळणार आहे.
नरनाळा महोत्सवात पर्यटकांसाठी वनपर्यटन, निसर्ग अभ्यास, वनस्पती अभ्यास,
पक्षी, प्राणी यांची ओळख, साहसी क्रीडा प्रकार, नौकाविहार अशी अनेक आकर्षणे आहेत. वनपर्यटनाबरोरच
साहसी क्रीडा प्रकार आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शोध व बचाव कार्य प्रशिक्षण आदी
महत्वाच्या बाबी निसर्गप्रेमी व विद्यार्थ्यांसाठी मोलाच्या ठरत असतात. यातून स्थानिक
आदिवासी बांधवांना रोजगारही मिळतो.
नरनाळ्याविषयी सांगताना अभ्यासक कलावंत प्रदीप गुरूखुद्दे म्हणतात की,
शहानूर हे गाव नरनाळ्याच्या पायथ्याशी एक टुमदार छोटेसे गाव आहे, या गावाच्या सभोवताली
वनसमृद्ध व निसर्गसुंदर परिसर हा सातपुडा पर्वताच्या रांगांनी वेढलेला आहे. नरनाळा
किल्ल्यावरुन निसर्गाकडे बघितले तर बाजूला सर्वत्र पर्वतांनी किल्ल्याला माळ घातल्याचा
भास होतो. हा परिसर पर्यटकांचे व निसर्ग अभ्यासकांचे मनमोहून टाकणारा आहे. नरनाळ्याची
पहिली तटबंदी पांडवांचे वंशज सम्राट नरेंद्रपुरी यांनी बांधली, असे सांगितले जाते.
किल्ल्याचे क्षेत्रफळ ३९३
एकराचे असून परकोटाचा परीघ जवळपास २७ मैल आहे. किल्ल्याची उंची जवळपास ३ हजार १५० फूट
असून त्याठिकाणी काळ्याशार दगडाच्या प्रचंड ऐतिहासिक इमारती, २२ भव्य दरवाजे आणि ३६६
अजस्त्र बुरुज असा ऐसपैस पसरलेला किल्ला आहे.
नरनाळा किल्ल्यातील तटबंदी, बुरुज आदींची काही प्रमाणात पडझड झालेली
असली तरी महाकाली दरवाजाचे सौंदर्य आजही ताजेतवाने वाटते. या किल्ल्यावर नरनाळा, जाफराबाद
आणि तेलियागड अशा तीन भागावर एकूण २२ तलाव आहेत. या तलावांमध्ये पावसाळ्याचे पाणी साठविण्याची
सोय कलेली आहे. त्या २२ तलावांपैकी ६ तलावांत भर उन्हाळ्यातही पाणी असते, त्यामुळे
या ठिकाणी वन्य प्राण्यांची ये जा असते. या किल्ल्यावर त्या काळात पाणीपुरवठ्याची सोय
होती. त्या पाणीपुरवठा योजनेचे अवशेष मन थक्क करणारे आहेत. राणीमहाल आणि इतर भागात
पाणी कसे पोहोचायचे ते आजही पहायला मिळते.
महाराष्ट्र शासनाने नरनाळा
परिसर अभयारण्य परिसर म्हणून घोषित केलेला आहे, अकोट वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षक
कार्यालयाच्या नियंत्रणात हा परिसर असून हा परिसर १३.३६ चौ. किलोमीटरपर्यंत सातपुडा
पर्वतांच्या टेकड्यांमध्ये व्यापलेला आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्प अभयारण्य या किल्ल्याच्या उत्तरेस आहे, या अभयारण्यात
वाघ, बिबट, सांबार,अस्वल,रानमांजर, कोल्हा, सायाळ, ससे आदी वन्यजीव नेहमी पर्यटकांना
दिसतात. हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने एक जिल्ह्याला वरदान मिळाले आहे. सरतेवेळी शेवटी
थोडक्यात सांगायचे म्हणजे नरनाळा किल्ला व तेथील परिसर विद्यार्थी व निसर्गप्रेमींसाठी
महत्वाचा भाग असून तेथील पर्यटन विकसित झाल्यास आदिवासी बांधवांसाठी रोजगार उपलब्ध
होणार आहे. नरनाळा महोत्सवामुळे पर्यटकांचे लक्ष वेधले जाईल व पर्यटन विकासाला चालना
मिळेल.
नरनाळ्याला कसे पोहचाल ?
नरनाळा किल्ला हा अकोट शहरापासून
२४ व अकोला शहरापासून सुमारे ६९ किलोमीटर अंतर आहे. अकोला येथून अकोट मार्गे शहानूर
- नरनाळा असे जाता येते. शहानूर या गावी असलेल्या प्रवेशद्वाराजवळ वाहन पार्किंग स्थळी
ठेवणे आवश्यक आहे. खाजगी वाहन किल्ल्यावर नेण्यास मनाई आहे.
नरनाळा किल्ल्यावर जाण्यासाठी जिप्सीची व्यवस्था आहे. गाईडही मिळतो.
राहण्यासाठी वन विभागाचे 'इको-टुरिझम' कॉटेजेसही आहेत.
००००

.jpeg)
.jpeg)


.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा