हिंद दी चादर - गुरु तेग बहादूर साहिबजी
विशेष लेख
हिंद दी चादर - गुरु तेग बहादूर साहिबजी
भारतीय इतिहासात सत्य, करुणा आणि मानवतेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या महान संत व योद्ध्यांचा समावेश आहे. अशा युगपुरुषांमध्ये शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी केवळ आपल्या श्रद्धेसाठी नव्हे, तर सर्व धर्मांच्या स्वातंत्र्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले म्हणूनच ते “हिंद दी चादर” — भारताची संरक्षक ढाल म्हणून ओळखले जातात.समाजाचे स्वातंत्र्य धोक्यात आले असताना गुरु तेग बहादूर साहिबजी निर्भयपणे अन्यायाविरुद्ध उभे राहिले. त्यांनी शस्त्रापेक्षा सत्य, संयम आणि नीतिमत्ता या मूल्यांना अधिक बळ दिले. त्यांच्या उपदेशात सेवा, साधेपणा, परोपकार आणि निर्भयता यांचा सातत्याने पुरस्कार दिसतो. त्यांच्या अनेक रचना आजही गुरु ग्रंथ साहिबमध्ये आदराने समाविष्ट आहेत.
जेव्हा संपूर्ण भारतात अन्याय वाढला होता, तेव्हा गुरु तेग बहादूर साहिबजींनी स्वतः पुढाकार घेतला. त्यांनी प्रतिकार केला, पण द्वेषाने नव्हे तर आत्मबलाने. त्यामुळे त्यांना हिंद दी चादर ही उपाधी मिळाली — म्हणजेच संपूर्ण भारताला झाकणारी करुणेची ढाल. ही उपाधी केवळ शिख समाजाची नव्हे, तर समस्त भारतीयांची कृतज्ञतेची अभिव्यक्ती आहे. त्यांनी सत्य, करुणा आणि मानवतेसाठी प्राणांचे बलिदान दिले.
“भै काहू को देत नहि, नहि भै मानत आन.”— ना कोणाला भीती दाखवावी, ना कोणाला घाबरावे, हा गुरु तेग बहादूर साहिबजींचा संदेश आजही मार्गदर्शक आहे.
आजच्या समाजात जेव्हा असहिष्णुता, द्वेष आणि ध्रुवीकरण वाढते, तेव्हा गुरु साहिबांचा जीवनसंदेश आपल्याला आठवण करून देतो की — दुसऱ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हाच खरा धर्म आहे.
गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्रात नांदेड, नागपूर व नवी मुंबई येथे राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभाग आणि विविध समाजघटकांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. हे केवळ स्मरण नव्हे, तर त्यांच्या विचारांचा जागर आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये टिकवणे हीच गुरु तेग बहादूर साहिबजींना खरी आदरांजली आहे.
- हर्षवर्धन पवार, जिल्हा माहिती अधिकारी
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा