मराठी भाषा विभागातर्फे ‘बोलींचा जागर’ भाषाविज्ञानात संशोधन आवश्यक : विद्यापीठाकडून नव्या अभ्यासक्रमांची रचना - कुलगुरू डॉ. अविनाश आवलगावकर
अकोला, दि. 22 : भाषेच्या संशोधन, संवर्धनाच्या अनुषंगाने साहित्याइतकेच भाषाविज्ञानही महत्वाचे आहे. हे लक्षात घेऊन रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाकडून नव्या अभ्यासक्रमांची रचना करण्यात येत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अविनाश आवलगावकर यांनी आज येथे केले.
मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, मराठी भाषा विद्यापीठातर्फे श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयात आयोजित 'बोलींचा जागर' कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. राज्याचे भाषा संचालक अरुण गीते, उपसंचालक संतोष गोसावी, विद्यापीठाचे विशेष कार्य अधिकारी राम राठोड, भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, डॉ.रामदास चवरे, प्रा. भगवान डोहळे, प्रकाश चव्हाण, समन्वयक डॉ.स्वप्नील इंगोले आदी यावेळी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. आवलगावकर म्हणाले की, भारतीय ज्ञानपरंपरा समृद्ध असून, तिच्याकडे केवळ आध्यात्मिक भूमिकेतून न पाहता वैज्ञानिक दृष्टीतून पाहिले पाहिजे. शास्त्रीय दृष्टीतून पाहिल्यास आपल्या ज्ञानपरंपरेच्या समृद्धी व सामर्थ्याची जाणीव होते. समाजात भाषा टिकण्यासाठी बोली टिकली पाहिजे. त्यासाठी व्यवहारात स्वभाषेचा वापर आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आग्रही राहिले पाहिजे.
पारधी आणि कलाली या मराठी बोलीभाषांबाबत कलाली बोली भाषातज्ज्ञ डॉ.रामदास चवरे, प्रा. भगवान डोहळे, तसेच पारधी बोली भाषातज्ज्ञ प्रकाश चव्हाण यांची व्याख्याने झाली. मराठी ही विविध बोलींनी समृद्ध असून, तिचे संवर्धन आवश्यक असल्याचे प्रतिपादन विविध मान्यवरांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचा प्रारंभ ग्रंथदिंडीने झाला. यावेळी विविध लोककलांचे सादरीकरणही करण्यात आले.
०००

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा