हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
अकोला, दि. 5 : सद्य:स्थितीत
हरभऱ्याचे पीक बहुतांश ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. या दरम्यान या पिकावर घाटे
अळीच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. घाटेअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनाबाबत जिल्हा
अधिक्षक कृषी कार्यालयातर्फे सूचना प्रसारित करण्यात आल्या आहेत.
घाटे अळी ही हरभरा पिकाची प्रमुख
किड असुन या किडींची मादी पतंग पानावर, कोवळया शेंड्यांवर, कळयांवर व
फुलांवर एकेरी अंडी घालते. ही अंडी खसखसीच्या दाण्यासारखी दिसतात. त्यातून २ ते ३
दिवसात अळी बाहेर पडते. ही अळी पानावरील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने
प्रथम पिवळसर पांदूरकी होऊन वाळतात व गळून पडतात. थोडया मोठ्या झालेल्या अळया
संपूर्ण पाने व कोवळी देठे खाऊन फस्त करतात. त्यामुळे झाडावर फक्त फांदयाच शिल्लक
राहतात. पुढे पिक फुलो-यावर आल्यावर हया अळीचा प्रादुर्भाव वाढतो व अळया
प्रामुख्याने फुले व घाटयांचे नुकसान करतात. मोठ्या झालेल्या अळया घाटयाला छिद्र
करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक अळी साधारणतः ३०-४० घाटयांचे नुकसान करते.
एकात्मिक व्यवस्थापन
· घाटे अळीचे परभक्षक उदा. बगळे, मैना, राघो, निळकंठ, काळी चिमणी
ईत्यादी पिकामधे फिरून घाटे अळया वेचून त्यांचे पिकावरील नियंत्रण करतात. अवाजवी
किटकनाशकाची फवारणी केल्यास पक्षी किटकनाशकांच्या वासामुळे शेतामधे येणार नाहीत.
त्यामुळे किटकनाशकाचा जास्त वापर टाळावा.
· ज्या शेतामधे मका किंवा ज्वारीचा नैसर्गिक पक्षी थांबे
म्हणुन उपयोग केला नसेल त्या शेतामधे बांबुचे त्रिकोणी पक्षी थांबे (प्रती हेक्टर
२० पक्षी थांबे) तयार करून शेतामधे लावावे. त्यामुळे पक्षांचे अळया वेचण्याचे काम
सोपे होते.
· कामगंध सापळ्याचा वापर करावा. यासाठी घाटे अळीचे कामगंध
सापळे (हेक्झाल्युर) एकरी दोन किंवा हेक्टरी पाच सापळे याप्रमाणे लावावेत.
सापळ्यामधे सतत तीन दिवस आठ ते दहा पंतग आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.
· शेतकरी बंधुंनी आपल्या पिकाचे निरीक्षण करून किडींवा
प्रादुर्भाव आर्थिक नुकसान संकेत पातळीच्यवर (१ अळया प्रति मिटर ओळ) आढळून आल्यास
किंवा ४० ते ५० टक्के पिक फुलो-यावर आल्यानंतर घाटे व्यवस्थापनासाठी खालील प्रमाणे
पिक परिस्थिती नुसार फवारणी करावी.
पहिली फवारणी (५० टक्के फुलोरावर
असतांना)
· निंबोळी अर्क ५ टक्के किंवा एच.ए.एन.पि.व्हि (१x१०० पिओबी / मिली) ५०० एल.ई./ हे.
किंवा क्विनॉलफॉस २५ ई.सी., २० मि.ली.
दुसरी फवारणी (पहिल्या
फवारणीनंतर १५ दिसानंतर)
· ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली किंवा
· इमामेक्टीन बेझोएट ५ टक्के एस जी ४ ग्रॅम किंवा
· स्पिनेटोरम ११.७० टक्के एससी ९ मिली किंवा
· क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल १८.५ एससी ३ मिली किंवा
· इंडोक्झाकार्ब १५.८० इसी ६.६ मिली किंवा
· लॅबडा सायहेलोथ्रीन ०.५ इसी १० मिली
वरील पैकी कोणत्याही एका
किटकनाशकाची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वरील किटकनाशकांची मात्रा
ही साध्या पंपासाठी असुन, पावरस्प्रे
साठी मात्रा तिप्पट करावी.
०००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा