पीक विमा योजना : पिंपरी खु. येथे तूर पीक कापणी प्रयोग

 







अकोला, दि. 12 : अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळातील पिंपरी खु. येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेत तूर पिकाचा पीक कापणी प्रयोग शुक्रवारी यशस्वीरीत्या राबविण्यात आला.
या पीक कापणी प्रयोगावेळी नाबार्ड विभागाचे जिल्हा विकास व्यवस्थापक श्री. श्रीराम वाघमारे सर, सौ. अस्मिता आवारे (तलाठी), भारतीय कृषी विमा कंपनीचे प्रतिनिधी श्री. अमोल ठोसरे व श्री. क्षितिज वाकोडे, तसेच संबंधित शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पीक कापणी प्रयोगाचे महत्त्व :
प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पीक कापणी प्रयोग हा अत्यंत महत्त्वाचा व निर्णायक घटक आहे. हा प्रयोग प्रत्यक्ष शेतावर शास्त्रीय व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येतो. यामध्ये निवडलेल्या क्षेत्रातून पिकाचे प्रत्यक्ष उत्पादन मोजले जाते व प्रति हेक्टर सरासरी उत्पादन निश्चित केले जाते.

या प्रयोगातून प्राप्त झालेल्या आकडेवारीच्या आधारे संबंधित क्षेत्रातील उत्पादनातील घट, हवामानातील प्रतिकूल परिणाम व इतर नैसर्गिक कारणांमुळे झालेल्या पिक नुकसानीचा अचूक अंदाज घेण्यात येतो. याच आधारे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विमा नुकसान भरपाईची गणना केली जाते.
सदर पीक कापणी प्रयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, सर्व संबंधित विभागांच्या उपस्थितीत व शेतकऱ्यांच्या साक्षीने पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात आला. या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना न्याय्य व वेळेत विमा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा