भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

 















भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा

अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे योजना व सेवा

अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर

पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर

अकोला, दि. 26 : केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करतानाच, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यावर भर देण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन, राष्ट्रगीत, महाराष्ट्रगीत, पथसंचलन, कवायती, सांस्कृतिक कार्यक्रम आदी कार्यक्रम लालबहादुर शास्त्री क्रीडांगण येथे झाले, त्यावेळी ते बोलत होते. आमदार अमोल मिटकरी, आमदार वसंत खंडेलवाल, जिल्हाधिकारी वर्षा मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मनपा आयुक्त सुनील लहाने आदी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वात भारत देश  प्रगतीच्या प्रत्येक क्षेत्रात झेप घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गतिमान विकासाची कास धरून महाराष्ट्राचे पहिल्या क्रमांकावरचे स्थान अधिक दृढ केले आहे. नागरिकांच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब शासकीय निर्णयात व कारभारात असावे, असा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. नागरिकांच्या गरजा जाणून घेऊन त्यानुसार प्रतिसाद प्रणाली निर्माण करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. जिल्हा डॅशबोर्ड, जिल्हा वॉररूम, व्हॉटस्ॲप चॅटबोट आदी नूतन सेवांचाही उल्लेख त्यांनी केला.

 

ते पुढे म्हणाले की, शेतकरी, कामगार, महिला अशा विविध घटकांसाठी अनेक योजना शासन राबवित आहे. अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानाच्या अनुषंगाने 3 लक्ष 31 हजार 994 शेतकऱ्यांच्या खात्यात 260 कोटी 39 लक्ष 26 हजार रू. मदत निधी डीबीटीद्वारे जमा करण्यात आला. जिल्ह्यात खरीप हंगामात 1 हजार 70 कोटी रू. तसेच रब्बी हंगामात 79 कोटी रू. कर्ज वितरण झाले. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगामामध्ये 2 लक्ष 22 हजार 84 शेतकरी सहभागी असून 1 लक्ष 84 हजार 191 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. रब्बी हंगामात 47 हजार 770 शेतकरी सहभागी होऊन 47 हजार 512 हे. क्षेत्र विमा संरक्षित झाले.

कृषी यांत्रिकीकरण, मनरेगा, तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, पीएम सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना,  राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान योजनांच्या अंमलबजावणीचीही त्यांनी माहिती दिली.  

ते पुढे म्हणाले की, आरोग्य विभागातर्फे विस्तारित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना,  राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासक कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शिवापूर, पातूर, बोरगाव मंजूर, अकोट येथील रुग्णालयाच्या इमारतींची कामे लवकरच पूर्ण होतील. अकोला जिल्हा पोलीस दलाकडून ‘प्रोजेक्ट त्रिनेत्र’ हा ‘एआय’ आधारित प्रकल्प राबविण्यात येत असून, ‘बॉडी क्राईम’ प्रकारातील गुन्ह्यात 64 टक्के घट झाली आहे. प्रोजेक्ट रक्षा’ या नागरिक प्रतिसाद प्रणालीद्वारे पोलीस सेवेची गुणवत्ता तपासून आवश्यक सुधारणा करण्यात येतात. त्यानुसार जिल्ह्याचा नागरिक विश्वास निर्देशांक 10 पैकी 8.9 असा उत्कृष्ट ठरला आहे, असेही त्यांनी सांगितले.    

नवीन कामगार संहितांच्या अनुषंगाने ते म्हणाले की, बदल केवळ औपचारिक न राहता ते कामगारांच्या हिताचे व सर्वसमावेशक असले पाहिजेत, याची दक्षता घेण्यात आली आहे. कामगारांच्या सामाजिक सुरक्षेपासून ते आर्थिक व कौटुंबिक अडचणींपर्यंत सर्व बाबींचा सकारात्मक व हितकारक दृष्टीने विचार करूनच निर्णय घेतले जातील. अकोला येथील नियोजित कामगार भवनासाठी 16 कोटी 61 लक्ष 920 रु. निधी वितरित झाला असून, कामगार विभागाचे सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार आहे.

जिल्ह्यात 4 लक्ष 55 हजार 32  कामगारांची ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करण्यात आली आहे. विविध कल्याणकारी योजनेत जिल्ह्यात 26 हजार 630 कामगारांना, सुरक्षा व अत्यावश्यक संचवाटप योजनेत 1 लक्ष 3 हजार 519 कामगारांना लाभ देण्यात आला. त्याचप्रमाणे, 1 लक्ष 8 हजार 239 कामगारांना गृहोपयोगी वस्तू संचवाटप करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा वार्षिक योजनेतून आपत्कालीन यंत्रणा बळकटीकरण, रूग्णालय सुधारणा, इको टुरिझम, वन पर्यटन, शाश्वत सिंचन, मृद व जलसंधारण कामे यांचीही माहिती त्यांनी दिली. 

जलजीवन मिशन कार्यक्रमात 4 अस्तित्वातील व 11 नवीन अशा एकूण 15 प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. वर्षभरात कामे पूर्ण होऊन जिल्ह्यातील 523 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे.

 

ऐतिहासिक महात्म्य व निसर्ग वैभव लाभलेल्या जिल्ह्यातील नरनाळा किल्ला येथे नरनाळा महोत्सव दि. 30 जानेवारी ते दि. 1 फेब्रुवारी दरम्यान होणार असून, त्याद्वारे पर्यटनाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रारंभी पालकमंत्र्यांनी विशेष वाहनातून पथकांचे अवलोकन केले. परेड कमांडर म्हणून आयपीएस अधिकारी ईशानी आनंद यांनी जबाबदारी सांभाळली. विविध पथकांनी पथसंचलन केले. विद्यार्थ्यांनी कवायती सादर केल्या.

 

०००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना

महिला सक्षमीकरणासाठी आदिशक्ती अभियान* *जिल्हाधिकारी वर्षा मीना*